मुंबई : म्हाडा कोकण मंडळाच्या ४,७५२ घरांसाठी १० मे रोजी सोडत काढण्यात येणार असून त्याची जाहिरात उद्या, सोमवारी (६ मार्च) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच बुधवार, ८ मार्चपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात करण्यात येणार आहे, असे म्हाडाने जाहीर केले.
अनेक बदलांसह आणि नव्या संगणकीय प्रणालीसह सोडत काढण्याची तयारी पूर्ण करून मंडळाने सोडतीचे वेळापत्रक निश्चित केले होते. ११ एप्रिलला सोडत काढण्यात येणार होती. मात्र, अर्ज विक्री, स्वीकृती सुरू होण्यास दोन दिवस असतानाच संपूर्ण प्रकिया रद्द करण्यात आली होती. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वानुसार १४ भूखंड आणि काही घरे वगळण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिल्याने सोडत पुढे ढकलावी लागली होती. पण आता मात्र सोडतीची तारीख अंतिम करण्यात आली आहे. सोडतीची जाहिरात सोमवारी प्रसिद्ध होणार असून बुधवारपासून अर्ज विक्री, स्वीकृतीस सुरुवात होईल, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मारुती मोरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
घरे कोणासाठी? किती?
– अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गट.
– एकूण ४,७५२ घरांचा समावेश.
– ४,७५२ पैकी ९८४ घरे पंतप्रधान आवास योजनेत.
– १,५५४ घरे २० टक्के योजनेत.
– उर्वरित घरे म्हाडा गृहनिर्माण योजनेत समाविष्ट.
प्रथम प्राधान्य योजनेसाठी..
सोडतीत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत विरार – बोळींजमधील २,०४८ घरांचा समावेश आहे. अल्प आणि मध्यम गटातील ही घरे आहेत. त्यांच्या किंमती २३ लाख ते ४१ लाख रुपयांदरम्यान आहेत. कोकण मंडळाच्या सोडतीत अनेक वर्षांनंतर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेचा समावेश करण्यात आला आहे. विरार – बोळींजमधील ही घरे विकली जात नसल्याने हा उपाय योजण्यात आला आहे. या घरांची अर्ज विक्री, स्वीकृतीस १७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने तसेच ‘आरटीजीएस’ वा ‘एनईएफटी’द्वारे अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १२ एप्रिल आहे. अर्जदारांची प्रारूप यादी २७ एप्रिल रोजी, तर अंतिम यादी ४ मे रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर १० मे रोजी सोडत काढण्यात येईल.
महत्त्वाच्या तारखा
- सोडत जाहिरात : सोमवार, ६ मार्च २०२३
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख : १२ एप्रिल २०२३
- सोडत : १० मे २०२३, सकाळी १० वा.
- स्थळ : ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृह.