मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांतील सुमारे एक हजार २३० कंत्राटी पदे रद्द करण्यात आली असून आता रुग्णालयांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील आरोग्य सेवेची मदार असलेल्या उरलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्य सेवेचा खेळखंडोबा होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णलये, दवाखान्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असलेली पदे महापालिका आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी यांनी तडकाफडकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आरोग्य सेवेचा भार सांभाळणाऱ्या सुमारे एक हजार २३० डॉक्टर, निम्नवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना सेवामुक्त करण्यात आले, तर काही जण लवकरच सेवामुक्त होत आहेत. यामुळे सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडू लागला आहे. त्यातच आता २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी केईम, शीव, नायर आणि कूपर या रुग्णालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागात दररोज किमान चार ते सहा हजार रुग्ण उपचारासाठी येतात.

हेही वाचा…मुंबई विद्यापीठात ‘बीबीए’ आणि ‘बीसीए’ अभ्यासक्रम रखडले, संबंधित अभ्यासमंडळ व अभ्यासक्रम तयार नसल्याने अभ्यासक्रम रखडले

अपुऱ्या मुष्यबळामुळे आधीच रुग्णसेवेवर प्रचंड ताण पडत होता. त्यातच रद्द करण्यात आलेली कंत्राटी पदे आणि त्यानंतर निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आलेले कर्मचारी यामुळे महानगरपालिकेची आराेग्य सेवा कोलमडण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या कामासाठी केईएम रुग्णालयातील १३०, शीव रुग्णालयातील ८० ते ९० आणि कूपर रुग्णालयातील २५ कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामामध्ये तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांबरोबरच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आल्याने आरोग्य सेवेवर अधिकच परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा…बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आरोपींनी संकेतस्थळावरून घर भाड्याने घेतल्याचे उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणुकीचे काम आणि कंत्राटी पदे रद्द केल्याने सध्या कार्यरत अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर व परिचारिका यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. लिपिक, वरिष्ठ लिपिक, लेखापाल आदी मंडळीही निवडणुकीच्या कामाला गेल्यामुळे प्रशासकीय कामांचा खोळंबा होत आहे. विविध प्रकारची देयके प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी गेल्यामुळे सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. मात्र रुग्णसेवा बाधित हाेणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्यात येईल, असे रुग्णालय प्रशासनांकडून स्पष्ट करण्यात आले.