मुंबई : ‘‘कविता तुमच्या संवेदना मागते, कविता तुमची जाणीव आणि शाहणीव मागते. कविता तुमची आयुष्याविषयीची, स्वत:विषयीची आणि जगण्याविषयीची समजून मागते. कविता तुमचा अनुभव मागते आणि त्या अनुभवांनी तुमच्या ओंजळीत दिलेला आशयही मागते.’’ असे म्हणत कवियित्री अरुणा ढेरे यांनी शनिवारी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर कवितेचे देखणे जग उलगडले.
कला साहित्याच्या आनंदोत्सवाची सुरेल सुरूवात ज्येष्ठ बासरीवादक पं. रोणू मुजुमदार आणि शास्त्रीय गायिका डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांनी आपल्या स्वराविष्काराने. कार्यशाळा, पुस्तक प्रदर्शन, नव्या पुस्तकांचे प्रकाशन, चित्र प्रदर्शन, चर्चासत्रे अशा विविधरंगी कार्यक्रमांनी पहिला दिवस सजला. स्वानंद किरकिरे यांच्या गीत स्वानंद या कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता झाली.
मराठी साहित्य, विविधांगी कला, संस्कृतीच्या ऐश्वर्याचा सौंदर्यसोहळा असलेल्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ च्या कार्यक्रमांच्या सुरुवातीलाच रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रभादेवी येथील रविंद्रनाट्य मंदिरात दिवसभर चाललेल्या कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. मुंबईत पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावूनही उत्साहाने रसिकांनी साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. नाट्यमंदिराचा परिसर कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींनी सजले होते. मराठी साहित्य आणि संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनाने आणि सजावटीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
काव्यप्रतिभेचा ‘देखणा’ कार्यक्रम
साहित्यिक कार्यक्रमांचा शुभारंभ प्रतिभावंत कवयित्री अरुणा ढेरे यांच्या ‘मी आणि माझी कविता’ या शुद्ध कवितेला वाहिलेल्या कार्यक्रमाने झाला. कधी नामवंत कवींच्या कवितेचे वाचन, कधी प्रवाही रसग्रहण तर कधी नामवंत कवींसोबतच्या आठवणी अशा विविध अंगाने सादर झालेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. दीड तास रंगलेल्या काव्ययात्रेला काव्यप्रेमींची जाणकार दाद मिळाली. कवितेचे नवे-जुने जग उलगडतानाच अरुणा ढेरे यांनी स्त्री मन, कवितेतील स्त्री आणि पुरुष कवींनी त्यातही पुरुष संतांनी स्त्री मनाचा वेध घेत केलेली अभिव्यक्ती याविषयीच्या कविता सादर केल्या.
संत ज्ञानेश्वर, मोरोपंत, अरुण कोलटकर, इंदिरा संत, बा. सी. मर्ढेकर, ना.घ. देशपांडे, रॉय किणीकर, नरेश मेहता अशा श्रेष्ठ कवींच्या कवितेचे सादरीकरण करतानाच त्यांनी कवितेतील स्त्री मनाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवले. तसेच शांता शेळके, बा.भ.बोरकर यांच्या सोबतच्या श्रीमंत करणाऱ्या आठवणी सांगत त्यांच्या कवितेतील सौंदर्य उलगडत शांताबाईंची ‘लोलक’ आणि बोरकरांची ‘निळा’ कविता सादर केली. ‘‘कवी प्रकाशाचा शब्द उच्चारत असतो तेव्हा जुनी कविता असो किंवा नवी जिथे जिथे कविता सापडेल तिथे कवितेचे बोट धरायला हवे. कारण कवी लिहीत राहतील, भेटत राहतील’’, असा आशावाद त्यांनी ‘लिटफेस्ट’च्या मंचावर व्यक्त केला. त्यांनी सादर केलेल्या ‘जादूची किल्ली’ आणि ‘सृष्टीचे उगमस्थान’ या कवितांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. अरुणा ढेरे यांच्या काव्यप्रतिभेने सजलेल्या या कार्यक्रमाची सांगता त्यांच्याच ‘करुणाष्टक’ या कवितेने झाली.
● मुख्य प्रायोजक : सारस्वत बँक
● सहप्रायोजक : केसरी टूर्स
● सहाय्य : कौटिल्य मल्टिक्रिएशन, सी एफ एस
● पॉवर्ड बाय : कालनिर्णय
