चव्हाणांचे नातेवाईक, देवयानी खोब्रागडे, सुरेश प्रभू आरोपी का नाहीत?

कोटय़वधी रुपयांच्या ‘आदर्श’ सोसायटी घोटाळ्याप्रकरणी नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात सीबीआयने माजी मुख्यमंत्री व आरोपी अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांसह राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना आरोपी का केलेले नाही

कोटय़वधी रुपयांच्या ‘आदर्श’ सोसायटी घोटाळ्याप्रकरणी नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात सीबीआयने माजी मुख्यमंत्री व आरोपी अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांसह राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना आरोपी का केलेले नाही, असा सवाल शुक्रवारी याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला.
सोसायटीतील ज्या अपात्र सदस्यांची यादी सीबीआय तयार करीत आहे त्यामध्ये राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा समावेश आहे. ही यादी लवकरच मुख्य सचिवांकडे देण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सरकार घेईल. त्यांचे सदस्यत्व रद्द करायचे की नाही याबाबतचा निर्णय सरकार घेऊ शकेल, असे सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल करतेवेळी विशेष न्यायालयाला सांगितले होते.
‘आदर्श’ घोटाळ्याप्रकरणी केतन तिरोडकर यांनी जनहित याचिका केली आहे. त्यावर सीबीआयने प्रतिज्ञापत्र सादर करताना पुरवणी आरोपपत्राबाबतची आणि तपास पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. तिरोडकर यांनी सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करतेवेळी या चौघांबाबत सीबीआय मौन का बाळगून आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. या चौघांनाही अपात्र असताना फ्लॅट देण्यात आले होते. त्यांना बेकायदेशीरपणे फ्लॅट देणाऱ्यांनी सीबीआयने पुरवणी आरोपपत्रात आरोपी दाखविले आहे. मात्र या चौघांबाबत काहीच नमूद केलेले नाही. चव्हाण यांना वाचविण्यासाठीच त्यांच्या नातेवाईकांबाबत सीबीआयने पुरवणी आरोपपत्रात मौन बाळगल्याचा आरोप तिरोडकर यांनी केला आहे. अपात्र सदस्यांची यादी तयार करून ती कारवाईसाठी मुख्यसचिवांकडे पाठविण्याची सीबीआयची भूमिका म्हणजे एखाद्या कारकूनासारखी असल्याचा आरोपही तिरोडकर यांनी केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ashok chavan relatives devyani khobragade suresh prabhu in adarsh scam