मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत प्रवासी महिलेकडून ६२६१ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. त्याची किंतम ६२ कोटी ६० लाख रुपये आहे. बिस्कीट व चॉकलेटच्या पुड्यात महिलेने अपली पदार्थ लपवले होते. याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाकल करून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
कतारमधील दोहा येऊन येणाऱ्या विमानातून एक महिला अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर डीआरआयने मुंबई विमातळावर सापळा रचला होता. त्यानुसार आरोपी महिला दोहा (कतर) येथून सोमवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली. डीआरआयच्या महिला अधिकाऱ्यांनी तिला मुंबई विमानतळावर उतरल्यावर थांबवले. तिला अमली पदार्थांबाबत विचारणा केली असता आपल्याकडे कोणतेही अमली पदार्थ नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर डीआरआयच्या महिला अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली. तिच्या बॅगेत ६ ओरेओ बिस्किटाचे पुडे आणि ३ चॉकलेटचे पुडे सापडले. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना तिच्यावर संशय आला. त्यांनी बिस्कीट व चॉकलेटच्या पुड्यांची तपासणी केली असता त्यामध्ये ३०० कॅप्सूल्स सापडल्या. त्यात पांढऱ्या रंगाची भुकटी होती.
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक चाचणी कीटद्वारे परीक्षण केल्यावर ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. महिलेकडे एकूण ६२६१ ग्रॅम कोकेन सापडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ६२ कोटी ६० लाख रुपये आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ते कोकेन जप्त केले. याप्रकरणी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या सर्व प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीचा सहभाग असल्याचा डीआरआयच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.
कोकेनची मोठ्या प्रमाणात तस्करी
मुंबई व दिल्लीतील येणारा हेरॉइन व कोकेनचा साठा तुलनेने सर्वाधिक आहे. उच्चभ्रू घरातील तरूण, कॉर्पोरेट, मोठे व्यावसायिक, चित्रपट कलाकार यांच्यामध्ये कोकेनला जास्त मागणी आहे. दक्षिण अमेरिका व आफ्रीकी देशांतून कोकेनची सर्वाधीक तस्करी होते. कोकेनच्या वितरणाचे मुंबई प्रमुख केंद्र आहे.
कोकेनच्या तस्करीसाठी पूर्वी आफ्रिका खंडातील गरीब देशांमध्ये नागरिकांचा वापर होत होता. पण सध्या दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया, व्हेनेझुएला, गयाना, ब्राझील, कोलंबिया आणि सुरीनाम या देशांतील गरीब नागरिकांचाही कोकेनच्या तस्करीसाठी वापर करण्यात येत आहे. कोकेनच्या तस्करीसाठी अदीस अबाबा ते दुबई व मग दुबई ते मुंबई हा हवाई मार्ग कुख्यात आहे. याच मार्गाचा वापर करून भारतात कोकेन येते. साओ पावलो येथूनही मोठ्या प्रमाणत कोकेनची तस्करी होते. भारतात राहून बेकायदेशीर कामे करण्यासाठी हे तस्कर नवनवीन कार्यपद्धतीचा वापर करतात.