मुंबई : मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने ३ दिवसांत ५ वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल १४ कोटी रुपयांचा हायड्रो गांजा, तसेच ३७ लाखांचे तस्करी करून आणलेले सोने जप्त केले. या कारवाया ६ ते ९ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आल्या.

पहिली कारवाई ६ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. बँकॉकवरून मुंबईत आलेल्या प्रवाशाच्या बॅगमध्ये २.८७ किलो हायड्रोपोनिक गांजा सापडला. जप्त मालाची किंमत सुमारे २ कोटी ८७ लाख इतकी आहे. दुसरी कारवाई ७ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. थायलंड येथील फुकेतवरून दोन प्रवासी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. त्यांच्या सामानाची तपासणी केल्यानंतर त्यात लपवलेला सुमारे ४ किलो हायड्रोपोनिक गांजा सापडला. या अंमली पदार्थांची किंमत सुमारे ४ कोटी २ लाख रुपये आहे. अन्य तीन कारवाया ८ नोव्हेंबर रोजी करण्यात आल्या. बॅंकॉक आणि नैरोबीमधून आलेल्या वेगवेगळ्या प्रवाशांकडून हायड्रो गांजा, तसेच तस्करी करून आणलेले २२ कॅरेट सोन्याचे बार जप्त करण्यात आले. जप्त सोन्याचे वजन ३५८ ग्रॅम असून किंमत सुमारे ३७ लाख इतकी आहे. या सर्व प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या पाच कारवायांमध्ये १३ किलो ८४ ग्रॅम हायड्रो गांजा आणि ३५८ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मालाचे बाजारमूल्य सुमारे १४ कोटी रुपये आहे. मुंबई सीमाशुल्क विभागाच्या परिमंडळ ३ ने ही कारवाई केली. आंतरराष्ट्रीय विमानांमधून येणाऱ्या प्रवाशांवर काटेकोर नजर ठेवण्यात येत आहे, आणि तस्करीचे सर्व प्रयत्न हाणून पाडले जातील, असे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हायड्रो गांजा म्हणजे काय?

हायड्रोपोनिक गांजा हायड्रो गांजा म्हणूूनही ओळखला जातो. थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर हायड्रो गांजा तयार केला जातो. त्यामुळे तेथून भारतात हायड्रो गांजाची तस्करी करण्यात येते. हायड्रो गांजा म्हणजे मातीशिवाय वाढवली जाणारी गांजाची वनस्पती. या पद्धतीमुळे उत्पादकांना वनस्पतीच्या वातावरणावर अचूक नियंत्रण ठेवता येते. परिणामी, या वनस्पती लवकर वाढतात आणि उत्पादकांना जास्त उत्पादनही मिळते. हायड्रोपोनिक्स ही मातीशिवाय लागवड केली जणारी एक पद्धत आहे. या पद्धतीतील वनस्पती पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या पाण्याच्या द्रावणात वाढवल्या जातात. बहुतांश वेळा त्यात कोको कॉयर, परलाइट, चिकणमाती किंवा रॉकवूल असे पोषक घटकदेखील टाकले जातात. वातानुकूलीत खोलीत एलईडी किंवा एचपीएस ग्रोथ लाईट्ससारख्या कृत्रिम दिव्यांचा वापर योग्य तापमान आणि आर्द्रता नियंत्रणात ठेवून आणि नियमित पोषक घटक देऊन त्याची निर्मिती केली जाते.