मुंबई : आयुष्याच्या प्रवासात एकमेकांवरील विश्वास महत्त्वपूर्ण ठरत असतो आणि पती – पत्नीचे नाते प्रेम व विश्वासावर टिकून असते. परंतु काही कारणास्तव याच नात्यात कटुता येऊन जोडीदाराच्या खुनाची सुपारी देण्याची वेळ आलेल्या एका नवऱ्याची आणि सुपारी घेणाऱ्या व्यक्तीची उडणारी त्रेधातिरपीट दाखविणारा ‘आतली बातमी फुटली’ हा मराठी चित्रपट १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
या आगामी मराठी चित्रपटाचा रंजक टिझर अलिकडेच प्रदर्शित झाला होता. अभिनेते मोहन आगाशे यांनी संवादातून आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या देहबोलीतून या टिझरची रंगत वाढवली आहे. केवळ शक्यतांचा अंदाज बांधून खुनाच्या सुपारीभोवती फिरणाऱ्या चित्रपटाच्या टिझरमधून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा गमतीशीर खेळ पाहायला मिळत आहे.
वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, अभिनेता सिद्धार्थ जाधव असे नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.
या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदी कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला ‘आतली बातमी फुटली’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. या चित्रपटाची निर्मिती विशाल पी.गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सहनिर्माता अम्मन अडवाणी, तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत.
‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ, तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी, तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहे.
वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची आणि नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. पात्रनिवड (कास्टिंग) जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.