मुंबईः जातीवाचक शब्दांचा वापर करून विद्यार्थिनीचा अपमान केल्याच्या आरोपाखाली दक्षिण मुंबईतील एका महाविद्यालयातील महिला प्राचार्यांविरोधात आझाद मैदान पोलिसांनी अनुसूचीत जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपांची तपासणी करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

२४ वर्षीय तक्रारदार तरूणी बी.एड्च्या पहिल्या वर्षाच्या दुसऱ्या सत्रात शिक्षण घेत आहे. तक्रारीनुसार, २४ जून २०२२ मध्ये पाठलेखन या प्रात्यक्षिक कार्यक्रमात विद्यार्थिनीच्या भाषेवरून तिला जातीवाचक शब्दांनी अपमानीत करण्यात आले. त्याशिवाय विद्यार्थिनीच्या मित्रांनाही जातीवाचक शब्दाने अपमानीत करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी तक्रारदार तरूणी व मैत्रीणींनी गणवेश बदलण्याबाबत प्राचार्यांना सांगितले, त्यावेळी आरोपी महिला प्राचार्याने त्यास नकार दिला.

याप्रकरणी भादंवि कलम ५०९(अश्लील टिप्पणी करणे) व अनुसूचीत जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण अनुसूचीत जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी याप्रकरणी तपास करणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी आरोपी महिला प्राचार्याविरोधात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपांची पडताळणी करून मार्गदर्शक तत्त्वानुसार तपास करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.