मुंबईतील अमेरिकी शाळेत बॉम्बस्फोट घडविण्याचे संभाषण फेसबुकवर करणाऱ्या एका २४ वर्षीय संगणक अभियंत्याला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. अनीस अन्सारी असे त्याचे नाव असून तो कुर्ला येथे राहणारा आहे.
अनीस अन्सारी हा बनावट फेसबुक खाते उघडून आपल्या एका मित्राशी गेल्या काही दिवसांपासून चॅटिंग करत होता. त्यावर दहशतवादविरोधी पथकाची नजर होती. अमेरिकेने सिरियामध्ये केलेले बॉम्बहल्ले आणि ‘इसिस’ (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया) या संघटनेविरोधात सुरू केलेल्या मोहिमेबद्दल तो द्वेषजनक वक्तव्य करत होता. ‘इसिस’चे विखारी प्रचार करणारे व्हिडियोसुद्धा तो सातत्याने पाहात होता. या चॅटिंगमध्ये त्याने आपण बीकेसी येथील अमेरिकी शाळेत बॉम्बस्फोट घडविणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून त्याला माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय दंडविधान संहितेचे ११५ (मृत्यूचा कट रचणे जे हत्येच्या कलम ३०२ नुसार वापरले जाते) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याने एक महिन्यापूर्वी पारपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्याचे हे संभाषण नेमके काय होते, बॉम्बस्फोट घडविण्याची त्याची खरोखरच योजना होती का, तसेच पारपत्र मिळवून तो मध्य आशियातील ‘इसिस’ संघटनेमध्ये सहभागी होणार होता का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हिमांशू रॉय यांनी दिली.  
अनीस हा अंधेरी येथील सीप्झ कंपनीत २०११पासून संगणक अभियंता म्हणून काम करतो. बीएमडब्ल्यू, मर्सिडिज आणि वोक्सव्ॉगन या गाडय़ांमध्ये जीपीआरएस प्रणालीचे डिझाइन तयार करण्याचे काम तो करतो. त्याला १९ हजार रुपये पगार आहे. इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या असलेला रिजाज भटकळ जिथे राहात होता त्या कुर्ला पश्चिम येथील वसाहतीत अन्सारी रहातो. हा भाग सिमीचे केंद्र म्हणून गाजला होता. अन्सारीचे वडील निवृत्त असून त्याला चार भावंडे आहेत. त्याला २६ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.