मुंबई- रस्त्याने पायी चालणारऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याच्या प्रयत्न करणाऱ्या चोराला नागरिकांना रंगेहाथ पकडले. त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. विक्रोळी येथे शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली.
फिर्यादी ऐश्वर्या राजू (३६) ही महिला विक्रोळीत राहते. शनिवारी संध्याकाळी ती दूध आणण्यासाठी निघाली होती. विक्रोळी येथील नारायण बोध पूलाच्या दिशेने पायी चालत जात असतान दोन इसम दुचाकीवरून तिच्याजवळ आले. दुचाकीच्या मागे बसलेल्या एकाने अचानक समोर येऊन ऐश्वर्याच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढण्याच्या प्रयत्न केला. मात्र ऐश्वर्या यांनी त्याला प्रतिकार करत आरडाओरड केली. ते पाहून परिसरातील लोकं जमा झाले. मंगळसूत्र खेचून पळणाऱ्या इसमाला लोकांनी पकडून बेदम चोप दिला. ते पाहून त्याचा दुसरा साथीदार दुचाकीवरून पळून गेला. डेन्झील फर्नांडीस (३८) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने फिर्यादी ऐश्वर्या यांच्या गळ्यातील चोरलेले ४२ ग्रॅम वजनाचे ३ लाख ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे.
फरार साथीदाराचा शोध सुरू
आरोपींविरोधात विक्रोळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक आरोपी हा गोरेगाव येथे राहणारा आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी कुठल्याही गुन्ह्याची नोंद आढळली नसल्याचे विक्रोळी पोलिसांना सांगतिले. त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरू आहे.
सोनसाखळी चोरीची वाढती समस्या
सोनसाखळी चोरी ही शहरांमध्ये विशेषतः मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे अशा ठिकाणी वाढती समस्या बनली आहे. गर्दीच्या ठिकाणी, मुख्यतः एकट्या महिलांना लक्ष्य करून ही चोरी केली जाते. सकाळी फिरण्यासाठी, देवळात जाण्यासाठी निघालेल्या महिला सोनसाखळी चोरांचे प्रमुख लक्ष्य असतात. सोनसाखळी चोरांच्या कार्यपध्दतीबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सोनसाखळी चोर दुचाकीवरून येतात. पायी चालणारी व्यक्ती बेसावध असताना झडप घालून सोनसाखळी ओढतात आणि काही सेकंदांत पसार होतात. अशा गुन्ह्यात शक्यतो २ जण एकत्र दुचाकीवरून फिरतात. ओळख पटू नये म्हणून दोघेही हेल्मेट घालतात. सोनसाखळी चोरी करताना अनेकदा महिलांना दुखापत होते. चोरीवेळी झालेल्या झटापटीत महिला गंभीर जखमी होतात. यामुळे महिलांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना वाढत असते. अनेकदा आरोपी परराज्यातून येऊन हे गुन्हे करून परत जातात. चोरीची सोनसाखळी त्वरित वितळवून विकली जाते, त्यामुळे साखळी परत मिळणे कठीण होते.
पोलिसांचे आवाहन
सकाळच्या वेळी मंदिरात जाताना, फिरण्यासाठी जाताना शक्यतो सोन्याचे दागिने, मंगळसूत्र घालू नये, रस्त्याच्या विरूध्द दिशेने चालावे, गळ्याभोवती स्कार्फ, ओढणी गुंडाळावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. लग्न समारंभात जाताना सोन्याचे दागिने घालून न जाता बॅगेत ठेवून न्यावे, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.