मुंबई : पाप-पुण्याची संकल्पना, विवेकबुद्धी हवी की नको अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर भगवंताशी संवाद साधताना खुद्द भगवंताला असलेले वलय, मोक्षाचा विचार, स्वर्ग – नरक याबद्दल थेट त्याच्याशी विचारविनिमय करणारा याचक यांच्यातील अतिशय अर्थपूर्ण संवाद ‘अरे देवा’ या अभिवाचनाच्या प्रयोगातून रसिकांना अनुभवता आला. ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर गुरुवारी पहिल्यांदाच अभिनेते अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी अभिवाचनाचा प्रयोग सादर केला.
पार्लेकर प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या लोकमान्य सेवा संघाच्या सभागृहात हा अभिवाचनाचा प्रयोग रंगला. ‘गेले पाच दिवस सुरू असलेल्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ महोत्सवात सादर झालेले एकापेक्षा एक कार्यक्रम, काही विशेष रचित प्रयोग लक्षात घेतले तर ‘अरे देवा’ सारख्या अभिवाचन प्रयोगाचे वैशिष्ट्य लक्षात येईल. कसलेले, वाङ्मयाची आणि सामाजिक जाण असलेले, स्वत:चे मत असलेले कलाकार खूप दुर्मीळ आहेत.
अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी या दोघांची आजवरची अभिनय कारकीर्द पाहिली तर ते दोघेही काय ताकदीचे कलाकार आहेत हे लक्षात येईल. असे दोन ताकदीचे कलाकार या प्रयोगाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर सादरीकरणासाठी एकत्र आले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे,’ अशा शब्दांत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या प्रयोग प्रस्तुतीमागचा उद्देश स्पष्ट केला.
इंग्रजीतील संवादलेखाचे रूपांतर
अमेरिकन तत्त्वज्ञ रेमण्ड स्मुलियन यांच्या ‘इज गॉड अ ताओईस्ट’ या इंग्रजीतील संवादलेखाचे रूपांतर अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी ‘अरे देवा’ या नावाने मराठीत केले आहे. ‘रेमण्ड स्मुलियन हे नुसते तत्त्वज्ञ म्हणावेत तर अत्यंत वल्ली असा हा माणूस होता. २०१७ मध्ये ते वयाच्या ९४ व्या वर्षी वारले. त्यांनी गणितात पीएचडी केली होती. ते जादूगार होते, त्यातही त्यांनी पीएचडी केली होती. त्यांना खगोलशास्त्रात रस होता. उत्तम पियानो वाजवत असत आणि तर्कशास्त्राचेही ते प्राध्यापक होते. त्यांना ताओईझममध्ये खूप रस होता. त्यांनी लिहिलेला ‘इज गॉड अ ताओईस्ट’ हा संवादलेख वाचल्यानंतर त्याचा मराठीत अनुवाद करावा असे मला वाटले. तत्त्वज्ञान हा या संवादाचा मूळ आधार आहे. त्या आधारावर भगवंत आणि पामर यांच्यात घडलेला संवाद या लेखात आहे’ असे सांगत अतुल कुलकर्णी यांनी ‘अरे देवा’ या अभिवाचन प्रयोगाची ओळख उपस्थितांना करून दिली.
……………………………….. ‘भगवंत आहे की नाही?’
‘भगवंत आहे की नाही?’ असा प्रश्न पामर थेट भगवंतालाच विचारतो. भगवंताचे अस्तित्व आहे की नाही या शोधप्रश्नाचा माग घेणारा हा गंमतीशीर संवाद अखेरीस भगवंत हा अंतिम सत्याकडे नेणारी प्रक्रिया आहे, इथवर येऊन पोहोचतो. मनुष्याची शोधप्रक्रिया संपली तर मी संपेन आणि कदाचित मलाही मुक्ती मिळेल, अगदी अशी कबुली भगवंत पामराला देतो. माणसाच्या मूलभूत आणि तरीही गंभीर प्रश्नांवर हलक्याफुलक्या संवादातून उहापोह करणाऱ्या या प्रयोगाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. या अभिवाचन प्रयोगाला नाट्यदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नाटककार प्रशांत दळवी, अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर आदी मान्यवरही उपस्थित होते.
