आज दुपारी एक वाजल्यापासून १०वीचा निकाल आनलाईन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. मात्र आता, विद्यार्थांनी निकालाच्या साईटवर गर्दी केल्याने साइट क्रॅश झाली आहे. त्यामुळे निकाल जाहीर होऊनही तो पाहता येत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही वैतागले आहेत. लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक एकाच वेळी निकाल पाहत असल्याने या साईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आल्याने हा प्रकार झाला आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले “ठाकरे सरकार हँग झालं आहे.  त्यामुळे १०वीच्या निकालाची वेबसाईट ‘हँग’ झाली तर नवल काय? ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना मनस्ताप देण्याची सुपारीचं घेतलेली दिसत आहे”

राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. सर्वात जास्त निकाल १०० टक्के कोकण विभागाचा लागला असून सर्वांत कमी निकाल ९९.८४ टक्के नागपूर विभागाचा आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हेही वाचा- Maharashtra SSC Result 2021: दहावीच्या परिक्षेत कोकणाची बाजी; राज्यात सर्वाधिक १०० टक्के निकाल

दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ४० मिनिटाहून अधिक वेळ डाऊन झाल्या आहेत. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे.

विद्यार्थी, पालक त्रस्त

दरम्यान, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने यंदा निकालासाठी result.mh-ssc.ac.in ही नवी लिंक बोर्डाने दिली आहे. यासोबतच बोर्डाची नेहमीची अधिकृत लिंक http://www.mahahsscsscboard.in येथेही निकाल पाहता येईल, असे बोर्डाने गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले होते. मात्र दुपारी १ वाजल्यापासून या दोन्ही लिंकवर जाऊन निकाल पाहण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर साईट डाऊन असल्याने विद्यार्थी, पालक त्रस्त झाले आहेत.

राज्यातील नऊ विभागांचा ९९.९५ टक्के निकाल लागला आहे. यापैकी कोकण विभागाचा १०० टक्के, अमरावती ९९.९८ टक्के, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर या विभागांचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.९२ टक्के तर सर्वात कमी ९९.८४ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.