Maharashtra Assembly session : भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंवर नाव न घेता हल्लाबोल केला. “तुमच्यावर बलात्काराचे आरोप झाले आणि त्याची चौकशीच झाली नाही,” असं गंभीर आरोप भातखळकरांनी केला. तसेच अडीच वर्षात तुम्ही सत्तेचा वापर करून बलात्कार करणाऱ्यांना प्रतिष्ठा आणि संरक्षण देण्याचं काम केलं. त्यामुळे तुम्हाला यावर बोलण्याचा कोणता अधिकार नाही, असंही मत व्यक्त केलं. ते बुधवारी (२४ ऑगस्ट) विधानसभा अधिवेशनात बोलत होते.

अतुल भातखळकर म्हणाले, “एका सदस्यांना फार राग आला आणि निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली. कशी पोलीस यंत्रणा वापरली. तुमच्यावर बलात्काराचे आरोप झाले आणि त्याची चौकशीच झाली नाही. त्यांना सदनात बसलेल्या एका माजी मंत्र्यांनी सांगितलं की त्यांच्यावरील आरोपांना आम्ही किंमत देत नाही, कारण आम्ही आमुक आमुक समाजाचं संरक्षण करतो.”

“बलात्काराचा आरोप असलेला मनुष्य आरोपी असतो”

“बलात्काराचा आरोप असलेला मनुष्य आरोपी असतो. त्याचा त्याच्या जातीशी काय संबंध आहे? मात्र, समर्थन केलं गेलं. हे पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही घडलं नाही. ते महाराष्ट्राने पाहिलं. राज्याच्या एका फार वरिष्ठ नेत्याने म्हटलं हे खरंय की बलात्काराचे आरोप झाले, मात्र, तक्रारकर्त्या महिलेचं चारित्र्य तपासण्याची गरज आहे. त्या दिवशी नैतिक महाराष्ट्राची मान खाली गेली असेल,” असं भातखळकर यांनी म्हटलं.

“बलात्काराचा आरोप केला त्यांना पोलीस संरक्षण नाही”

भातखळकर पुढे म्हणाले, “ज्यांनी बलात्काराचा आरोप केला त्यांना पोलीस संरक्षण नाही, उलट त्यांच्यामागे पोलीस लावण्यात आले. त्यांच्या गाडीत पिस्तुल ठेवण्यात आलं. अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले. प्रचंड दबाव आणण्यात आले. असं असताना तुम्ही अंतिम आठवडा प्रस्तावात बलात्कार, घरफोड्यांवर बोलत आहात.”

हेही वाचा : मंत्री चांगलंच उत्तर देतील अशी हमी तुम्ही कशी देता? जयंत पाटलांच्या खोचक प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्ही बलात्कार करणाऱ्यांना प्रतिष्ठा आणि संरक्षण देण्याचं काम केलं”

“तुम्ही अडीच वर्षात सत्तेचा वापर करून बलात्कार करणाऱ्यांना प्रतिष्ठा आणि संरक्षण देण्याचं काम केलं. तुम्हाला यावर बोलण्याचा कोणता अधिकार आहे? तुम्हाला कोणताही अधिकार नाही. त्यामुळे तुम्ही या प्रस्तावात बलात्काराच्या विषयाला स्पर्श करण्याचीही आवश्यकता नव्हती,” असंही त्यांनी नमूद केलं.