मुंबई : चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकच येत नसल्याची चिंता व्यक्त होत असतानाच बहुपडदा चित्रपटगृहांसाठी ‘राष्ट्रीय चित्रपट दिना’निमित्त २३ सप्टेंबरचा दिवस विक्रमी प्रेक्षकसंख्येचा ठरणार आहे. ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारी ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी अभूतपूर्व आगाऊ नोंदणी केली. आतापर्यंत ७० टक्के नोंदणी झाली असून उद्या १०० टक्के प्रेक्षक उपस्थिती असेल, असा विश्वास बहुपडदा चित्रपटगृह व्यावसायिकांनी व्यक्त केला.

दरवर्षी १६ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ म्हणून पाळण्यात येतो. मात्र यंदा बहुपडदा चित्रपटगृह व्यावसायिकांनी एकत्र येऊन संघटनेच्या माध्यमातून २३ सप्टेंबर हा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्याचा प्रयत्न म्हणून कोणताही चित्रपट ७५ रुपयांच्या तिकिटात पाहता येईल, अशी घोषणाही करण्यात आली.

घोषणेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तिसऱ्या आठवडय़ात प्रवेश करणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाबरोबरच शुक्रवारी नव्याने प्रदर्शित होत असलेले ‘चुप’ आणि ‘धोकाझ्र् राऊंड द कॉर्नर’ हे चित्रपटही ७५ रुपयांत बहुपडदा चित्रपटगृहात पाहता येणार आहेत.

राष्ट्रीय चित्रपट दिनकशासाठी?

 दरवर्षी चित्रपटांना जगवणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ पाळण्यात येतो. परदेशात अनेक ठिकाणी ‘कॉफी डे’सारख्या विशेष दिनांचे आयोजन केले जाते आणि त्या दिवशी कमीत कमी किंमतीत कॉफी उपलब्ध करून दिली जाते. त्याच धर्तीवर या खास दिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांनी कमीत कमी खर्चात चित्रपटांचा आनंद घेता यावा यासाठी ७५ रुपये तिकिटाची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती ‘मूव्हीमॅक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल साव्हनी यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रेक्षक चित्रपटगृहातच चित्रपट पाहण्यासाठी पसंती देत आले आहेत, यापुढेही हे प्राधान्य कायम असेल. ‘राष्ट्रीय चित्रपट दिना’निमित्ताने घेण्यात आलेल्या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादावरून हे लक्षात आले आहे. देशभरातील प्रेक्षक याला प्रतिसाद देतील, याची खात्री आम्हाला होती.  – गौतम दत्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीव्हीआर