मुंबई : मुंबईत गेल्या तीन दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने ऑगस्ट महिन्याची सरासरी ओलांडली आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात १ ते १९ ऑगस्टपर्यंत ७९१.८ मिमी पावसाची नोंद झाली असून सांताक्रूझ येथे तब्बल २२५.४ मिमी अधिक पाऊस नोंदला गेला आहे.

सांताक्रूझ येथे संपूर्ण ऑगस्ट महिन्यात साधारणपणे ५६६.४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र, केवळ तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ही सरासरी ओलांडली गेली आहे. यामध्ये विशेष म्हणजे, दोन दिवसांत २०० मिमीहून अधिक पाऊस सांताक्रूझ केंद्रात नोंदला गेला आहे. येथे दोन दिवसांत म्हणजेच शनिवार, १६ ऑगस्ट रोजी २४४.७ मिमी, तसेच मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी २३८.२ मिमी पाऊस झाला आहे.

या पावसामुळे सांताक्रूझ येथील सरासरी गाठणे शक्य झाले आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, याआधीही काही वेळा ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला आहे. २०२० मध्ये ऑगस्ट महिन्यात सांताक्रूझ येथे तब्बल १००५.२ मिमी पाऊस नोंदला गेला होता. ऑगस्ट २०१७ मध्ये ७९९.७ मिमी इतकी पावसाची नोंद झाली होती. तर २०१९ मध्ये ही नोंद ७४७.७ मिमी इतकी होती. यंदा १९ ऑगस्टपर्यंतच ७९१.८ मिमी पाऊस झाल्याने, उर्वरित दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कुलाब्यात सरासरी इतका

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ ते १९ ऑगस्टपर्यंत ४३२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. साधारणपणे कुलाबा येथे ऑगस्ट महिन्यात ४८२.१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असतो. सध्याची आकडेवारी लक्षात घेता कुलाबा येथील सरासरी ओलांडली जाणार असल्याचे दिसून येत आहे. कुलाबा येथे सांताक्रूझ इतकी पावसाची नोंद झाली नसली तरी मागील दोन – तीन दिवस ६० ते ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. याचबरोबर सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत ११०.४ मिमी पावसाची नोंद झाली.

गेल्या काही वर्षांतील आकडेवारी

यापूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये कुलाबा येथे ११२८.३ मिमी,तर सांताक्रूझ येथे १२४०.१ मिमी पावसाची नोंद झाली होती. याचबरोबर २०१७ मध्ये ९५०.३ मिमी, २०१० मध्ये १०२३.३ मिमी पाऊस नोंदला गेला होता. तसेच २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद २०२० मध्ये झाली होती. यावेळी कुलाबा येथे ३३१.८ मिमी, तर सांताक्रूझ येथे २६८.६ मिमी पाऊस नोंदला गेला होता.