Baba Siddique Murder Case Update: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मुंबईतील नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून बाबा सिद्दिकी बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांत त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या. तीन आरोपींनी हा हल्ला केल्याचं तपासात निष्पन्न झालं असून त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. रात्रीच्या अंधारात पसार झालेल्या आरोपींपैकी दोघांच्या पोलिसांनी शिताफीनं मुसक्या आवळल्या. पण तिसऱ्या आरोपीनं अंधाराचा आणि गोंधळाचा फायदा घेत तिथून पोबारा केला. मात्र, एका फोटोमुळे पोलिसांना आरोपींची ओळख आणि या सगळ्या कारस्थानाचा छडा लागल्याचं आता स्पष्ट झालं आहे!

आरोपींचा छडा आणि महिन्याभराची रेकी!

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून त्यातील बारकावे कसे समोर आले, याबाबत पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे. “हत्येनंतर आम्ही तीन हल्लेखोरांपैकी दोघांना पकडलं. त्यानंतर लगेचच आम्ही त्यांचे मोबाईल फोन तपासले. आम्हाला धर्मराज कश्यपच्या मोबाईलमध्ये त्या तिघांचा एक फोटो सापडला. आम्ही जेव्हा कश्यपला त्याबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं आम्हाला सांगितलं की गेल्या महिन्याभरापासून ते तिघे मुंबईत राहात होते. यादरम्यान ते जुहू बीचवर गेले होते. कारण त्याबद्दल त्यांनी खूप ऐकलं होतं”, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्यानं दिली.

“जुहू बीचवर त्या तिघांनी त्यांचा एक फोटो काढला. कश्यपच्या मोबाईलमध्ये हा फोटो काढण्यात आला. हा फोटो आमच्या तपासात खूप महत्त्वाचा होता. कारण त्यातूनच आम्हाला तिसऱ्या फरार आरोपीची ओळख पटली आणि ते तिघे या कटात एकत्र होते याचाही छडा लागला”, असंही त्यांनी सांगितलं.

हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी धर्मराज कश्यप (१९ वर्षं) व गौतम (२४ वर्षं) हे दोघे उत्तर प्रदेशच्या बाहराइचचे रहिवासी आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे दोघे पुण्याहून मुंबईत दाखल झाले. काही दिवसांत गुरमेल सिंग (२३ वर्षं) हादेखील हरियाणाच्या कैथलमधून मुंबईत दाखल झाला.

कुरिअरने आली हत्यारं?

दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी सिद्दिकींना गोळ्या झाडल्या ती पिस्तुलं कुर्ला पश्चिममध्ये ते राहात असलेल्या खोलीवर कुरिअरने आल्याचं समोर आलं आहे. या महिन्याभरात आरोपींनी त्यांच्या खोलीपासून सिद्दिकींच्या कार्यालयापर्यात व घरापर्यंत ऑटोने प्रवास करून त्या भागाची अनेकदा रेकी केल्याचं समोर आलं आहे. बाबा सिद्दिकी कोण हे आरोपींना समजण्यासाठी त्यांच्या एका बॅनरचा फोटो आरोपींना देण्यात आला होता.

Who killed Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे ‘या’ गँगचा हात; आरोपींनी दिली धक्कादायक माहिती

“रेकी करण्याबरोबरच हे आरोपी इतरही काही ठिकाणी गेले. जुहू चौपाटीवर जेव्हा ते गेले, तेव्हा त्यांनी फोटोही काढला”, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली. कुर्ला पश्चिममध्ये हे आरोपी राहात होते त्या खोलीशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं त्यातल्या एकाला बाहेर सिगारेट पिताना पाहिल्याचं सांगितलं. “मी दररोज सकाळी माझ्या कुत्र्‍याला बाहेर फिरायला घेऊन जातो. तेव्हा त्यांच्यातला एकजण बाहेरच सिगारेट पिताना दिसायचा. एकदा त्यानं माझा कुत्रा कुठल्या प्रजातीचा आहे हेही विचारलं होतं. तो माझ्याशी इंग्रजीत बोलत होता. मला वाटलं तो चांगला सुशिक्षित मुलगा आहे. पण जेव्हा टीव्हीवर त्याचा फोटो पाहिला, तेव्हा मला धक्काच बसला”, असं या शेजाऱ्यानं सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरा एक शेजारी मोईन यानं ते तिघे नेहमी बाहेर दिसत नसत असं सांगितलं. “त्यांच्या खोलीची लाईट नेहमी चालूच असायची. पण ते कधीतरीच बाहेर दिसायचे. एकदाच त्यांच्या घराबाहेर कचरा साठल्यानंतर मी खिडकीवर थाप दिली. कश्यपनं थोडीशी खिडकी उघडली आणि कचरा साफ करतो असं सांगितलं. फक्त ओले कपडे वाळत टाकण्यासाठीच ते घराबाहेर यायचे”, असं मोईननं सांगितलं.