मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) करण्याच्या मागणीसाठी पत्नी शहझीन यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाने मंगळवारी दखल घेतली. तसेच, या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहआयुक्तांसह तपास अधिकाऱ्यांना दिले.

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह. भोसले यांच्या खंडपीठापुढे शहझीन यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने तपास अधिकारी किशोर कुमार शिंदे आणि पोलिस सहआयुक्त यांना न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले.

तथापि, वारंवार विनंती करूनही सिद्दीकी यांचे पुत्र झिशान यांचा जबाब अद्याप नोंदवण्यात आला नसल्याचे शहझीन यांच्यावतीने वरिष्ठ वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. झिशान यांच्या संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यावर, खंडपीठाने प्रश्न उपस्थित करून प्रकरणाच्या तपासातील प्रगतीची नोंदवही सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, झिशान यांचा जबाब नोंदवण्यात आला. तथापि, याचिकाकर्तीने मात्र त्याचे खंडन केले आहे. त्यामुळे, परस्परविरोधी दाव्यांतील स्थिती पोलिसांच्या तपासाबाबतच्या नोंदवहीमुळे स्पष्ट होईल, असेही न्यायालयाने पोलिसांचे तोंडी आश्वासन फेटाळून लावताना नमूद केले.

पोलिस झिशान याच्या संपर्कात असल्याच्या व्हॉट्सअॅप संदेश आणि कॉल नोंदी विशेष सरकारी वकील महेश मुळ्ये यांनी न्यायालयात सादर केल्या. झिशान हे संपर्कात आहेत की नाहीत ते आम्हाला माहिती नाही, हा एका खुनाच्या गुन्ह्याशी संबंधित तपास आहे. तुम्ही कायदेशीररित्या स्वीकारार्ह पुरावे सादर करा, अशा शब्दात न्यायालायाने पोलिसांना सुनावले. तसेच, उपरोक्त आदेशाचा पुनरूच्चार केला.

झिशान यांना आलेली धमकी गांभीर्याने घ्या

बाबा सिद्दीकी आणि झिशान यांनी हत्येच्या काही आठवड्यांपूर्वी वारंवार सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करून पोलिस संरक्षण पुनर्संचयित करण्याची मागणी केली होती, अशी माहिती यावेळी न्यायालयाला देण्यात आली. त्यावर, झिशान यांच्या सुरक्षेबाबत सूचना घेण्यात येईल, अशी माहिती सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने पोलिसांना या मुद्याची जाणीव करून द्या आणि योग्य त्या उपाययोजना करा, असे आदेश न्यायालयाने दिले.