मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तरला कॅनडामध्ये ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानी गॅंगस्टर शेहजाद भट्टीने त्याला पळण्यास मदत केल्याचा आणि आश्रय दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर वायरल झाला होता. या माहितीची मुंबई पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.
सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित २६ आरोपींविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईलाही आरोपी करण्यात आले आहे. अनमोलच्या सूचनेवरून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. सिद्धीकी यांच्यावरील संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी झिशान अख्तरवर सोपवण्यात आली होती. त्याने सर्व गुंड जमा करून सिद्दीकी यांच्यावर गोळीबार घडवून आणला. पण या हल्ल्याच्या पूर्वीच तो पळून गेला होता. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला नाही. नुकतीच त्याची एक चित्रफित व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.
झिशान अख्तरने देश सोडून गेल्याचा दावा केला होता. त्यांतर आता त्याला कॅनडामध्ये ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याला कॅनडात पकडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पण गुन्हे शाखेला अद्याप कोणतीही अधिकृत माहिती केंद्रीय यंत्रणांकडून देण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मुंबई पोलिसही या माहितीची पडताळणी करीत आहेत.
याप्रकरणातील आरोपी शुभम लोणकर व मोहम्म झिशान अख्तर यांना बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटाची माहिती होती. याप्रकरणातील अटक आरोपी सुजीत सिंह हा मोहम्मद झिशान अख्तर याच्याशीही संपर्क साधत होता. याप्रकरणातील हल्लेखोर गुरमेल सिंह हा कारागृहात झिशान अख्तरच्या संपर्कात आला होता.