Baba Siddique Murder Son Zeeshan First Social Media Post : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. वांद्रे येथील निर्मल नगरमधील आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दिकींवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली आहे. या हत्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून त्यांनी या हल्ल्यातील काही संशयित आरोपींना महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागातून अटक देखील केली आहे. त्यांची चौकशी देखील चालू आहे. या चौकशीतून वेगवेगळ्या प्रकारची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशातच वडिलांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र व वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत, तसेच वडिलांच्या मारेकऱ्यांना इशारा देखील दिला आहे.

झिशान सिद्दिकी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “त्यांनी माझ्या वडिलांना मारलं, पण ते विसरतायत की ते सिंह होते आणि त्या सिंहाचा अंश माझ्यातही आहे. त्यांच्या लढा माझ्याही रक्तात वाहतोय. ते नेहमी न्यायासाठी उभे राहिले. परिवर्तनासाठी लढले. या लढाईच्या काळात त्यांनी मोठ्या धैर्याने वादळांचा सामना केला. ज्यांनी माझ्या वडिलांना मारलं त्यांनी असं समजू नये की ते जिंकलेत, त्यांना मला सांगायचं आहे की त्या सिंहाचं रक्त माझ्या धमण्यांमधून वाहतंय. मी अजूनही इथेच आहे, निर्भय व ठामपणे उभा आहे. त्यांनी एकाला मारलं, पण त्यांच्या जागी आता मी उभा आहे. ही लढाई आत्ता संपणार नाही. माझे वडील जिथं होते, तिथंच आज मी उभा आहे, ठाम, निश्चल आणि पूर्ण तयारीनिशी…, माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील लोकांना मला सांगायचं आहे की मी सदैव त्यांच्याबरोबर आहे.”

हे ही वाचा >> दिल्लीतल्या स्फोटाचं कारण काय? घटनास्थळावरील ‘पांढऱ्या पावडर’मुळे फॉरेन्सिक टीम चकीत; दहशतवादी कटाचा संशय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Zeeshan siddique
झिशान सिद्दिकी यांची एक्सवरील पोस्ट (PC : Zeeshan siddique/X)

झिशान सिद्दिकींकडून भावना व्यक्त

आमदार सिद्दिकी यांनी याआधी देखील अशीच एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की “माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरांचं व त्यांचं संरक्षण करताना आपला जीव गमावला. माझं कुटुंब आज मोडून पडलंय. परंतु, माझ्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण केलं जाऊ नये आणि त्यांचा संघर्ष व्यर्थ जाऊ नये असं मला वाटतं. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे”.