नूतनीकरण होत असलेल्या राणीच्या बागेत मूलभूत गरजांकडे मात्र दुर्लक्ष
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्राणिसंग्रहालयाचे (राणीची बाग) नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला तरी, हे करताना येथील प्राण्यांच्या देखभालीसाठी आवश्यक गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे. आजारी असलेल्या प्राण्यांवर उपचार करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘डार्ट गन’ प्राणिसंग्रहालयात नसल्याचे समोर येत आहे. सुमारे पाच महिन्यांपूर्वी या बंदुकीअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने पाणघोडय़ाच्या एका पिल्लाचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव यानिमित्ताने उघड झाले आहे.
येत्या काळात राणीच्या बागेत परदेशी प्राण्यांचे दर्शन घडविण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. मात्र सद्य:स्थितीत संग्रहालयात असणाऱ्या प्राण्यांच्या देखभालीकरिता व उपचारासाठी आवश्यक असलेली मूलभूत साधने या ठिकाणी उपलब्ध नाहीत. एखादा प्राणी आजारी असल्यास किंवा त्याला उपचाराकरिता बेशुद्ध करावयाचे झाल्यास इंजेक्शनचा मारा करणारे ‘डार्ट गन’ संग्रहालय प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ मर्यादित अंतरापर्यंत ‘ब्लो पाइप’च्या द्वारे इंजेक्शनचा मारा करण्याच्या तंत्रावर कर्मचाऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पाणघोडय़ाचे एक वर्षांचे पिल्लू धनुर्वाताने सात ते आठ दिवस त्रस्त होते. मात्र पिल्लाची आई हिंस्र असल्याने उपचार करण्यासाठी पिल्लाजवळ जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर ती धावून येत होती. ‘डार्ट गन’ नसल्याने पिल्लांच्या आईला बेशुद्घ करता आले नाही. त्यामुळे पिल्लाला रुग्णालयात नेऊन उपचार करणे कठीण झाले आणि या परिस्थितीत पिल्लाचा मृत्यू झाल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. मात्र त्यानंतरही पिल्लाचे शव काढण्यासाठी आम्हाला बरेच कष्ट करावे लागल्याचे त्यांनी सांगितले. पिल्लाचे मृत शरीर सोडण्यास आई तयार नसल्यामुळे तिला हिसकावून दुसऱ्या पिंजऱ्यात नेण्यात आले. आणि त्यानंतर पिल्लाचे शव बाहेर काढण्यात आले.
खर्चाच्या भीतीने खरेदी नाही
जाड कातडीच्या प्राण्यांकरिता वेगळ्या आणि साधारण ३ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या ‘डार्ट गन’ची आवश्यकता आहे. या ‘डार्ट गन’मध्ये दूरवर मारा करण्याची क्षमता असते. शिवाय दूरवर अधिक वेगाने जात, जाड कातडीचा वेध घेण्यासाठी आवश्यक ऊर्जा निर्माण करणारे तंत्र त्यामध्ये विकसित असते. मात्र किमतीच्या कारणास्तव प्रशासन या साधनाच्या खरेदीकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे भविष्यात एखादा प्राणी अनवधानाने पिंजऱ्याबाहेर पडल्यास त्याला बेशुद्ध करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आधुनिक साधन प्रशासनाकडे उपलब्ध नाही. दरम्यान, रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साधनांची खरेदी केली असून उर्वरित साधने लवकरच खरेदी करणार असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
