आश्वासनाची पूर्तता करण्यात राज्य सरकार अपयशी; आज स्मृतीदिन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यात वर्षभरात स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी करूनही हे स्मारक रखडले आहे. ट्रस्ट स्थापन करण्यास विलंब झाल्यानंतर आता महापौर बंगल्याची जागा ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याबाबतही काहीच पावले टाकली जात नसल्याने हे स्मारक रखडले आहे. राज्य सरकार व महापालिका पातळीवर याबाबत फारसा पुढाकार घेत नसल्याने स्मारक उभारणीस विलंब होत आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले होते. त्यानंतर त्यांचे स्मारक शिवाजी पार्क किंवा त्याच परिसरात करण्याची घोषणा झाली. स्मारकासाठी काही जागांचे पर्याय सुचविले गेले व कायदेशीर अडचणींवर बराच ऊहापोह झाला. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली होती. त्यानंतर महापौर बंगल्यात हे स्मारक करण्याचे ठरविण्यात आले आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या वर्षी ठाकरे यांच्या स्मृतिदिनी वर्षभरात स्मारक उभारण्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत केली होती. मात्र या स्मारकासाठी ट्रस्टमध्ये कोणाचा समावेश असावा, हा प्रश्न दीर्घकाळ रेंगाळला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील ट्रस्टमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, भाजपतर्फे खासदार पूनम महाजन, आदित्य ठाकरे व काही मोजक्या व्यक्ती, महापालिका व शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
ट्रस्टच्या स्थापनेनंतर महापौर बंगला ट्रस्टकडे हस्तांतरित करणे आवश्यक असून त्याची प्रक्रिया अडकली आहे. महापौरांची पर्यायी निवासी व्यवस्था भायखळा येथे करण्याचे प्रस्तावित होते. पण त्यावर पुढे काहीच झाले नसून राज्य सरकारकडूनही कोणतीच पावले टाकली गेलेली नाहीत. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिवसेना सहभागी असून महापालिकेतही शिवसेनेची सत्ता आहे. तरीही शिवसेनाप्रमुखांचे स्मारक अजून लालफितीत अडकले आहे. शिवसेनाप्रमुखांचा गुरुवारी स्मृतिदिन असून शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी शेकडो शिवसेना कार्यकर्ते त्यांना आदरांजली वाहणार आहेत.