मुंबई : मंत्रालयातील प्रवेशाचे नियम आणखी कठोर करण्यात येणार असून अभ्यागतांना प्रवेश मिळण्यासाठी पूर्वनोंदणी करूनच वेळ घ्यावी लागेल. ज्या विभागामध्ये काम आहे, त्याच मजल्यावर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार असून पिशवी, बॅग किंवा १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मंत्रालयात नेता येणार नाही. मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांच्या संख्येवरही नियंत्रण आणण्यात येणार आहे. गृह विभागाने मंत्रालय प्रवेश व सुरक्षेचे नवे नियम मंगळवारी जाहीर केले असून ते महिनाभरात लागू केले जाणार आहेत.

 मंत्रालयात २५ विभाग असून त्यांचे टपाल मंत्रालयाच्या प्रवेशद्वारात द्यावे लागणार आहे. अभ्यागतांना मोबाइल अ‍ॅपवर संबंधितांच्या भेटीबाबत वेळेसाठी पूर्वनोंदणी करावी लागेल. ज्या विभागात काम आहे, त्याच मजल्यावर अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार आहे. मंत्रालयात प्रतिदिन सुमारे ३५००  तर मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी पाच हजार अभ्यागत येतात.  मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांच्याच मोटारगाडय़ा येतील. सनदी अधिकाऱ्यांच्या गाडय़ा सचिव प्रवेशद्वारातून तर आमदार व इतरांच्या वाहनांना बगीचा प्रवेशद्वारातून आत येता येईल.  कर्मचाऱ्यांचे जेवणाचे डबे वगळता बाहेरील खाद्यपदार्थ मंत्रालयात आणण्यास प्रतिबंध असतील. मेट्रो सबवेमध्ये कर्मचारी व अभ्यागत यांच्या तपासणीसाठी कक्ष उभा करण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छतावर जाण्यास प्रतिबंध

मंत्रालयाच्या छतावर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत. तसेच खिडक्या व बाल्कनीमधून उडय़ा मारण्याचे प्रकार बंद करण्यासाठी विशिष्ट प्रकारची यंत्रणा (अनव्हिजिबल स्टील रोप) लावण्यात येणार आहेत. आमदार व लोकप्रतिनिधीबरोबर येणाऱ्या अभ्यागतांनाही प्रवेश पासाचे बंधन असेल, असे आदेश गृह खात्याने जारी केले आहेत.