मुंबई : भर दुपारी रिक्षात एका अनोळखी इसमाने रिक्षात शिरून १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना वांद्रे येथे घडली. रिक्षा सिग्नलला थांबली असताना आरोपी रिक्षात शिरला आणि चालकाला शस्त्राचा धाक दाखवून रिक्षा सुरू ठेवायला सांगितली. यानंतर त्याने धावत्या रिक्षात मागील आसनावर बसलेल्या महाविद्यालयीन तरूणीचा विनयभंग केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पीडित तरुणी १६ वर्षांची असून वांद्रे येथे राहते. दररोज दुपारी ती रिक्षाने महाविद्यालयात जाते. सोमवारी दुपारी तिने नेहमीप्रमाणे एस.व्ही. रोड येथील बॉस्टन हॉटेलजवळून एक रिक्षा पकडली. दुपारी १२ च्या सुमारास रिक्षा सायबा हॉटेलजवळील सिग्नलवर थांबली. त्यावेळी रस्त्यावर गर्दी होती. काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक इसम अचानक रिक्षात शिरला.
रिक्षाचालक आणि त्या तरूणीने त्याला खाली उतरायला सांगितले. मात्र तो उतरायला तयार नव्हता. मला काही अंतरच पुढे जायचे आहे, दुसरी रिक्षा मिळत नाही असे सांगून तो जबरदस्तीने आत बसून राहिला. तरुणी आणि रिक्षाचालक त्याला उतरायला सांगत असतानाच सिग्नल सुटताच त्याने धारदार शस्रासारखी एक वस्तू काढली. रिक्षा थांबवायची नाही, अन्यथा मारून टाकेन अशी धमकी त्याने दिली. या प्रकारामुळे रिक्षाचालक आणि ती तरुणी दोघेही घाबरले. रिक्षा सुरू होताच त्याने अश्लील शेरेबाजी करीत तरुणीचा विनयभंग केला. पुढील सिग्नलवर रिक्षा थांबल्यावर तो उतरून पळून गेला. या प्रकारामुळे तरूणी प्रचंड घाबरली होती. ती महाविद्यालयात न जाता घरी परत आली. तिने हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला.
वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पीडित मुलीच्या काकांनी सोमवारी संध्याकाळी वांद्रे पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ (विनयभंग), ७८ (अश्लील कृत्य करणे), ७९ (चोरून पाठलाग करणे), तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यातील (पोक्सो) कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला.
वेगवेगळी पथके तैनात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. या मार्गावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासण्यात येत आहे. पीडित तरुणीने दिलेल्या वर्णनावरून संशियाचे रेखाचित्र तयाक करण्यात आले आहे. स्थानिक खबरी, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी वांद्रे पोलिसांनी एका संशियाताला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. आम्ही काही वेळापूर्वी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केल्यानंतर नेमका प्रकार समजेल, असे वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांनी सांगितले.
विनयभंगाच्या वाढत्या घटना
मुंबई शहर आणि उपनगरात विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. २०२३ मध्ये विनयभागंच्या १ हजार ५१ घटनांची नोंद होती. त्यात २०२४ मध्ये १६ टक्क्यांनी वाढ झाली. २०२४ मध्ये विनयभंगाचे एकूण २ हजार ३९७ गुन्हे दाखल करण्यात आले होते.