कुलदीप घायवट

जागतिक वारसा असलेल्या पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकाच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे वांद्रे स्थानकाला झळाळी मिळाली असून ते प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. विशेषतः रात्री विद्युत रोषणाईमुळे स्थानक अधिकच नेत्रदीपक ठरू लागले आहे. या स्थानकाच्या संवर्धन व दुरुस्तीसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, हा खर्च कमी करून १०.३२ कोटी रुपयांत जीर्णोद्धाराचे काम पश्चिम रेल्वेने केले आहे.

मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या यादीत वांद्रे स्थानकाची इमारत ही ‘अ’ श्रेणीत नोंदवण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांची रहदारी दिवसेंदिवस वाढत असल्याने वांद्रे स्थानकाची ऐतिहासिक इमारत दुर्लक्षित झाली. तसेच, स्थानकाचे अनेक भाग जीर्ण झाले होते. त्यामुळे संवर्धनाचे काम पश्चिम रेल्वेने जानेवारी २०२१ मध्ये हाती घेतले. कमानदार छत आणि उंच मनोरे अशी वैशिष्ट्यपूर्ण बांधणी या स्थानकाची आहे. रेल्वेच्या नोंदीनुसार हे संपूर्ण छत लंडनमध्ये जोडून जहाजाने मुंबईत पाठवण्यात आले होते. नंतर ते उभ्या असलेल्या खांबांवर ठेवण्यात आले होते. पश्चिम रेल्वेने पुनर्विकासाच्या कामामध्ये जीर्ण झालेली किंवा मोडलेली कौले काढून भारतीय बनावटीचे कौलारू छत केले आहे. मुख्य इमारतीची लाकडी चौकट मजबूत करण्यात आली आहे. सर्व लाकडी बांधकाम, नक्षीकामाला चकाकी दिली आहे.

हेही वाचा >>>मुंबई: महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाची ५० टक्के पदे रिक्त; मानवी हक्कांच्या उल्लंघन प्रकरणामध्ये मोठी वाढ

वांद्रे स्थानकातील लाकडी आसने, दरवाजे, खिडक्या, प्रवेशद्वारेदेखील वेगळ्या धाटणीची तयार आहेत त्याचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मूळ रचना, नक्षीकाम याला कोणताही धोका न पोहचवता पुनर्विकासाचे काम करण्यात आले आहे. सिमेंटचे अनावश्यक बांधकाम काढून दगडी भिंतीचे मूळ स्वरूप दर्शनी केले आहे.

कमी खर्चात काम पूर्ण
अपेक्षित खर्चामधील दीड कोटी रुपयांची बचत करून हे काम केले आहे. सध्या तिकीट खिडक्यांचे काम सुरू आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>>मुंबई: कूपर रुग्णालयात ‘कांगारू मदर केअर’ कक्ष

वांद्रे स्थानक सुरू करण्याचा प्रस्ताव १८६४ साली मंजूर करण्यात आला. त्यानंतर १८६९ साली वांद्रे स्थानकातून रेल्वे सुरू झाली. १८८८ दरम्यान वांद्रे स्थानकाचे सौंदर्यीकरण आणि फलाटाचे सुशोभीकरण करण्यात आले. या वास्तूला १९९५ साली जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले. संवर्धनाचे काम २००८-०९ साली हाती घेतले होते. तर, २०१९ मध्ये पुन्हा एकदा सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वांद्रे स्थानकातील मूळ प्रवासी संख्या – १,०१,२२५
रोजचे प्रवासी संख्या – २,५९,५४७