भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांच्यात सध्या सुरू असलेल्या वादाचा फटका ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी सराव करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला बसला आहे. भारतीय महिला संघाचे सराव शिबीर वानखेडे स्टेडियमवर आठवडाभर रंगणार होते. पण या वादामुळे मंगळवारी सुरू होणारे हे शिबीर आता बुधवारपासून क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू झाले. २१ ऑक्टोबपर्यंत हे सराव शिबीर सीसीआयवर रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारभार कुणाच्या हाती सोपवायचा, या विवंचनेत सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे. त्यामुळेच भारत आणि वेस्ट यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणारा चौथा एकदिवसीय सामना बीसीसीआयने ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवत एमसीएला आणखीन डिवचण्याचा प्रयत्न केला. विनवण्या करूनही हा सामना अन्यत्र हलविण्यात आल्याने एमसीएचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत.

एमसीएमध्ये लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले आणि व्हीएम. कानडे यांची प्रशासकीय समितीवर नियुक्ती केली होती. पण त्यांचा कार्यकाळ १५ सप्टेंबर रोजी संपल्याने एमसीएला वाली उरलेला नाही. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीवर असलेल्या आणि माजी महिला क्रिकेटपटू डायना एडल्जी यांनी मात्र या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. ‘‘खेळपट्टीच्या वादामुळे भारतीय महिला संघ विश्वचषकासाठी सराव करू शकल्या नाहीत, ही बातमी ऐकून मी निराश झाले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताच्या पुरुष संघाला अशी वागणूक मिळाली असती का? त्यामुळे महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंमध्ये दुजाभाव का केला जात आहे?’’ असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

एडल्जी म्हणाल्या की, ‘‘हा विश्वचषकासाठीचा सराव आहे. त्यामुळे स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन हे शिबीर सुरू व्हायलाच हवे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने हे शिबीर बुधवारपासून सुरू व्हावे, असे आदेश दिले आहेत. बीसीसीआयचे महाव्यवस्थापक साबा करीम यांनी आम्हाला तसे आश्वासन दिले आहे.’’

‘‘महिला क्रिकेट संघाचे शिबीर आयोजित करण्याची विनंती आम्हाला बीसीसीआयने केली आणि त्यानंतर आम्ही लगेच होकार कळवला. आता ब्रेबॉर्न स्टेडियमवर हे शिबीर २१ ऑक्टोबपर्यंत रंगणार आहे,’’ असे सीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci mca controversy hit womens training camp
First published on: 18-10-2018 at 01:58 IST