मुंबई : नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाने पाच पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण केले आहे. त्यानुसार या इमारतीतील ८६४ घरांचा ताबा दिवाळीत देण्याचे नियोजन मुंबई मंडळाचे होते. मात्र निवासी दाखला न मिळाल्याने आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने घरांच्या चावी वाटपाचा मुहूर्त ठरत नव्हता. पण आता मात्र चावी वाटपाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारची तारीख दिल्याने आता बुधवारी १२ नोव्हेंबरला चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
मुंबई मंडळाकडून वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव या तीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या तिन्ही ठिकाणी पहिल्या, दुसर्या टप्प्यात पुनर्वसित इमारतींचे कामे वेगात सुरु आहेत. वरळीतील पहिल्या टप्प्यातील पुनर्वसित इमारतीतील ५५६ घरांचा नुकताच ताबा देण्यात आला असून रहिवासी नव्या घरात राहण्यास गेले आहेत.
आता नायगावमधील ८६४ बीडीडी वासियांची गृहस्वप्नपूर्ती अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यातील पाच पुनर्वसित इमारतींचे काम काही दिवसांपूर्वीच मंडळाकडून पूर्ण करण्यात आले आहे. या घरांसाठी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरु होती. ही प्रक्रिया पार पाडत घरांना निवासी दाखला घेऊन दिवाळीत घरांचा ताबा देण्याचे नियोजन मंडळाचे होते. मात्र ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्याने ताबा देण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली.
अखेर मंडळाला घरांसाठी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले त्यानंतर तात्काळ मंडळाने निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया सुरु केली तर दुसरीकडे घरांच्या चावी वाटपाच्या कार्यक्रमाचीही तयारी सुरु केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासाठी वेळ घेण्याचेही प्रयत्न मंडळाचे सुरु होते.
बुधवारची तारीख मुख्यमंत्र्यांनी दिली असली तरी आता केवळ वेळ निश्चित होणे शिल्लक असल्याचेही अधिकार्यांनी दिली. ही वेळ उद्यापर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार प्रकल्पस्थळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फीत कापून इमारतींचे लोकार्पण करतील. त्यानंतर माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात चावी वाटपाचा कार्यक्रम होईल. प्रातिनिधिक स्वरूपात काही रहिवाशांना चावी वाटप केले जाईल. त्यानंतर मंडळाकडून प्रत्यक्ष घराचा ताबा देण्यास सुरुवात होईल.
