मुंबई : Corona Virus In Mumbai देशामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना केंद्र सरकारने दक्ष राहण्याच्या सूचना दिल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून तातडीने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये राज्य व जिल्हा स्तरावर रुग्णालयाची तयारी, मॉकड्रील बाबतच्या सूचना, औषधसाठा आणि इतर साधन सामग्रीबाबत तयारीचा आढावा घेण्यात आला.
राज्यामध्ये बुधवारी ४८३ करोना रुग्ण सापडले असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या अडीच हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे करोनाचा प्रमाण वाढत असले तरी घाबरू नका, पण काळजी घेण्याचा सल्लाही नागरिकांना देण्यात आला.
राज्यामध्ये वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी २९ मार्चला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली करोना तयारीसंदर्भातील आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आरोग्य विभागाचे संचालक, सहसंचालक, उपसंचालक तसेच राज्य कृती दलाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला आणि महापालिकांना विशेष सूचना करण्यात आल्या. राज्यातील रुग्ण चाचणीचा सकारात्मक दर हा मागील महिन्यांच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढला असून, २२ ते २८ मार्चदरम्यान हा दर ६.१५ टक्के आहे.
सूचना काय?
- रुग्णालय स्तरावर आणि कार्यक्षेत्रात भेटीदरम्यान आरोग्य कर्मचारी यांनी सौम्य ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, घशामध्ये खवखव, श्वसनाचा त्रास, धाप लागणे, तीव्र खोकला यांसारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने तपासणी करावी
- करोना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी करोना चाचणी येणाऱ्या सकारात्मक रुग्णांचे नमूने नियमित पाठवावेत.
- रुग्णांचा पाठपुरावा करण्याच्या मार्गदर्शक सूचना आणि विलगीकरणाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा.
- रुग्णालयात औषधे आणि साहित्य उपलब्ध राहतील याची खातरजमा करावी.
- प्रत्येक जिल्ह्यात तातडीने नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावा.
राज्यात ‘एच ३ एन २’चे आठ नवे रुग्ण
राज्यामध्ये बुधवारी ‘एच३ एन२’च्या आठ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ३४१ झाली आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत इन्फल्युएंझाचे ३ लाख ५३,११६ संशयित रुग्ण सापडले आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तिथे आवश्यक औषधोपचार व साधनसामुग्रीचा साठा ठेवला असून राज्यातील सर्व जिल्हा आरोग्यअधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.