मुंबई : वांद्रे येथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. बेस्टने वांद्रे वसाहत बसस्थानक ते चर्चगेट असा वातानुकूलित बसचा ‘ए-८७’ हा नवीन बसमार्ग सुरू केला आहे.

सकाळी ७.१५ वाजता पहिली बस या मार्गावरून सुटेल. त्यानंतर १५ मिनिटांच्या फरकाने या मार्गावरून आणखी दोन बस सुटतील. परतीच्या प्रवासासाठी जागतिक व्यापर केंद्र येथून सायंकाळी ७.४०, ७.५० आणि रात्री ८.०५ वाजता तीन बस सोडण्यात येतील. मंत्रालय, चर्चगेट, पं. पलुस्कर चौक, वसंतराव नाईक चौक, वरळी, माहीम असा या बसचा मार्ग असेल. शुक्रवारपासून हा मार्ग सुरू झाला आहे.

वांद्रे-चर्चगेट फेरीनंतर (सकाळी साडेआठनंतर) या बसगाडय़ा चर्चगेट येथील अहिल्यादेवी होळकर चौक ते जागतिक व्यापार केंद्र, या मार्गावर वातानुकूलित बसमार्ग ‘ए-२’वर चालवल्या जातील. तसेच या मार्गावर जागतिक व्यापार केंद्र येथून चर्चगेटसाठी सकाळी ८.५० वाजता गाडय़ा सोडण्यात येतील.

त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धारावी आगार वातानुकूलित बसमार्गात बदल करण्यात आला आहे. १ नोव्हेंबरपासून ही सीएसएमटी येथून पी. डिमेलो मार्ग, कर्नाक बंदर, वाडी बंदर, पूर्व मुक्त मार्ग, देवनार आगार, सुमननगर, राणी लक्ष्मीबाई चौक मार्गे  चालवली जाणार आहे. धारावी आगारातून या बसगाडय़ा सीएसएमटी येथे आल्यानंतर सकाळी साडेआठनंतर सीएसएमटी ते एनपीसीए दरम्यान ए-१ या मार्गावर चालविल्या जातील.