मुंबई : मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात विजेवर धावणारी दुमजली वातानुकूलित बस दाखल होणार होती. मात्र हा मुहूर्तही टळण्याची चिन्हे आहेत. ही बसगाडी अद्यापही चाचण्यांमध्येच अडकली असून  फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या बेस्ट उपक्रमाकडे ४५ विनावातानुकूलित दुमजली बस आहेत. एकमजली बसमधून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात. दुमजली बसची एकूण प्रवासी क्षमता ७६ इतकी आहे. प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक असलेल्या दुमजली वातानुकूलित बस टप्प्याटप्याने प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला असून अशा ९०० बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या दुमजली बसला ऑगस्ट २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता.

हेही वाचा >>> मुंबई : पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचा बेस्टला मदतीचा हात, तब्बल इतक्या कोटींची मदत केली जाहीर…

त्यानंतर पुण्यातील ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया सेंटरमध्ये (एआरएआय) या बसच्या चाचणीला सुरुवात झाली. चाचणीनंतर बसला प्रमाणपत्र उपलब्ध होईल आणि त्यानंतर आधी सप्टेंबरमध्ये आणि नंतर ऑक्टोबरमध्ये ही बसगाडी प्रवाशांच्या सेवेत येईल असा दावा करण्यात आला होता. मात्र  प्रवाशांच्या सेवेत दुमजली बस आल्याच नाहीत. मात्र हे दोन्ही मुहूर्त हुकले. त्यानंतर १४ जानेवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र या बसची चाचणी अद्याप सुरूच आहे. त्यामुळे हा मुहूर्तही टळण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर अपघातांमध्ये वाढ, दोन वर्षात तब्बल इतक्या मृत्यूंची नोंद

पुण्यातील ‘एआरएआय’मध्ये दुमजली वातानुकूलित बसची चाचणी सुरू असून बसला प्रमाणपत्र मिळताच ती मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. अशा पाच दुमजली बस येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सेवेत दाखल होण्याची शक्यता असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. येत्या १४ जानेवारी २०२३ पर्यंत ५० दुमजली वातानुकूलित बस येणार असल्याचे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी २ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत  सांगितले होते. एकूण ९०० वातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार आहेत. ताफ्यात दाखल होणाऱ्या विजेवर धावणाऱ्या काही दुमजली बसच्या वरील भागाचे छत काढून ओपन डेक बस करण्याची बेस्टची योजना असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा >>> नवी मुंबई: मकरसंक्रांतीत महागाईची झळ; तिळाच्या दरात ४०रुपयांनी वाढ

दुमजली वातानुकूलित बसची वैशिष्ट्य

  • बसची  आसन क्षमता ६६ असून उभ्याने दहा प्रवासी प्रवास करू शकतात.
  • सीसी टीव्ही कॅमेरे, बसमधील दोन वाहकांना परस्पर संपर्क साधता यावा यासाठी विशेष व्यवस्था
  • दुमजली वातानुकूलित बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बस चालकाकडे
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best air conditioned double decker bus also missed makar sankranti time mumbai print news ysh
First published on: 13-01-2023 at 16:16 IST