Best Buses : मुंबईकर जेवढे लोकल ट्रेनवर अवलंबून आहेत तेवढेच बेस्ट बसवरही अवलंबून आहेत. बेस्ट बसची भाडेवाढ झाली आहे. तरीही ऑफिस गाठण्यासाठी अनेक प्रवासी बेस्टचा आधार घेत असतात. मात्र बेस्टचं टाइमटेबल कोलमडलं आहे. वेळेत बस येत नाहीत त्यामुळे लोकांना गर्दी आणि त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. नरिमन पॉईंट ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे अंतर गाठण्यासाठी १० ते १२ मिनिटं लागतात. मात्र यासाठी अर्धा ते पाऊण तास थांबावं लागतं आहे. इतकंच नाही तर बस वेळेवर न आल्याने लोकांना रांगेतही अर्धा तास किंवा त्याहून अधिक वाट बघावी लागते आहे. मंत्रालय, विधान भवन परिसरात लोकांनी या सगळ्याबाबत संताप व्यक्त केला आहे. लोकसत्ताची प्रतिनिधी सिद्धी शिंदेने ऑफिसवरुन छत्रपती शिवाजी टर्मिनस गाठणाऱ्या मुंबईकरांचा आक्रोश जाणून घेतला आहे.
अधिवेशन सुरु झाल्यानंतर तिथला बस स्टॉप बंद
विधानसभा अधिवेशन सुरु असल्याने तिथला बस स्टॉप हा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्या समोर असलेल्या बस स्टॉपवर आणि त्यानंतर येणाऱ्या साखर भवन या बस स्टॉपवर गर्दीचा महापूर लोटलेला पाहण्यास मिळतो आहे. बसेसच्या फेऱ्या कमी, भाडं ६ ऐवजी १२ रुपये आणि गर्दी, धक्काबुक्की अशा सगळ्या वेदना मुंबईकर रोज सहन करत आहेत. या मार्गावर धावणाऱ्या बसेस आणि डबल डेकर बसेस यांचे स्वयंचलित दरवाजे अनेकदा बंद होत नाहीत इतकी गर्दी या बसमध्ये होते अशी स्थिती आहे.
मुंबईकरांचं या सगळ्या परिस्थिती बाबत म्हणणं काय?
“सुरुवातीला १६ ते १८ बस होत्या, ज्यांच्या फेऱ्या होत असत ती संख्या आता ६ ते ८ बसवर आली आहे. एवढी गर्दी होते की लोकांना गर्दीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. साखर भवन ते एक्स्प्रेस टॉवरपर्यंत अनेकदा रांगा जातात त्यामुळे अनेकांना बस मिळतही नाही. पुढच्या बससाठी किमान अर्धा तास प्रतीक्षा करावी लागते. बेस्टचा कारभार म्हणजे सावळागोंधळ आहे. दारावर लटकूनही अनेक प्रवासी प्रवास करतात. मी कल्याणला राहतो. मला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी पोहचायला ४५ मिनिटे लागतात. त्यामुळे अनेकदा फास्ट लोकल मिळत नाही. घरी पोहचायला पुढे आणखी दीड तास ते पावणेदोन तास लागतात. अधिवेशन सुरु आहे त्यावेळी मंत्र्यांच्या गाड्या आधी सोडतात आणि बस थांबवून ठेवतात तेव्हा तर आणखी त्रास होतो.”
आम्हाला धक्काबुक्कीची सवलत
A-115, 138 आणि क्रमांक 8 क्रमांकाच्या बसेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावतात. त्यांच्याबाबतीत ही अशीच परिस्थिती आहे. महिलांना काही सवलत वगैरे मिळते का पुढच्या दरवाजाने प्रवेश करण्याची वगैरे? असं विचारलं असता एका महिला प्रवाशाने सांगितलं, “आम्हाला धक्काबुक्कीची सवलत मिळते बाकी कसलीच नाही. दहा मिनिटांचं अंतर आहे पण एसबीआयच्या सिग्नलवर बस अनेकदा थांबते त्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणी जायला ४० ते ५० मिनिटं लागतात. पावसाळ्यात तर आम्ही अनेकदा चालत गेलो आहोत.” असंही एका महिला प्रवाशाने सांगितलं.

४० मिनिटं रांगेत, छत्रपती शिवाजी टर्मिनस गाठण्यासाठी एक तास
आम्हाला अनेकदा ४० मिनिटं रांगेत थांबावं लागतं. पण आमचे हाल होत आहेत.बस उशिरा मिळते. त्यात गर्दी होते. वेटिंग टाइम प्रचंड आहे. समोरच्या बाजूने महिलांना प्रवेश नाही. संध्याकाळ असो किंवा सकाळची वेळ आमचे हाल होतात. ऑफिसच्या वेळात आम्हाला यायला उशीर होतो. त्यानंतर निघायला उशीर झाल्यानंतर आम्हाला या ठिकाणी निघायलाच उशीर होतो. बसेसची फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे असं मला वाटतं असं महिला प्रवाशाने सांगितलं. तसंच पैसे जास्त घेत आहेत तर तशा सेवाही दिल्या पाहिजेत. एसी, बंद असतो, बसेस गळत असतात, रोज आम्ही हाफ डे मार्क आम्ही करु शकत नाही, असंही एका महिला प्रवाशाने सांगितलं.
बेस्टच्या वाहकांचं म्हणणं काय?
अनेकदा पहिल्याच स्टॉपला बस भरते आणि इतकी गर्दी होते की आम्हाला बसमध्ये चढताच येत नाही. आम्हाला किमान उभं राहून तरी प्रवास करता यावा एवढी आमची अपेक्षा आहे. एसी बस आहे त्यामुळे फारशी तक्रार नाही पण किमान आम्हाला बसमध्ये चढण्यासाठी जागा मिळावी असंही एका प्रवाशाने सांगितलं. दरम्यान लोकसत्ता ऑनलाइनने या संदर्भात बेस्ट बसच्या वाहकांशीही संवाद साधला. त्यांनी कॅमेरावर न बोलण्याच्या आणि नाव जाहीर न करण्याच्या अटीवर हे सांगितलं की जी परिस्थिती आहे त्यामुळे आम्हीही हतबल आहोत. आम्ही या सगळ्याबाबत काहीही करु शकत नाही. कारण ज्या सुविधा दिल्या जात आहेत त्या अशाच आहेत. प्रवाशांची अवस्था पाहून आम्हाला वाईटच वाटतं पण काय करणार? असं नाईलाज मांडणारं उत्तर त्यांनी दिलं.