बेस्ट उपक्रमाने दोन वेळा बस भाडेवाढ करण्याच्या प्रस्तावांना बेस्ट समिती आणि महापालिकेची मंजुरी मिळविल्यानंतर आता आपल्या आगारांमधील वाहनतळांच्या शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहन मालकांना महिनाकाठी अवजड वाहनांसाठी पाच हजार रुपये, तर हलक्या वाहनांसाठी चार हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र हा प्रस्ताव अद्याप बेस्ट समितीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
डळमळीत झालेला आर्थिक डोलारा सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाने फेब्रुवारीमध्ये बस भाडेवाढ केली आणि आता १ एप्रिलपासून पुन्हा बेस्ट बसच्या किमान भाडय़ात एक रुपयाने वाढ होणार आहे. आता बेस्टने आपल्या आगारांमधील पार्कीग शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेस्टला काही प्रमाणात महसूल मिळू शकेल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
मुंबईमध्ये वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे वाहनमालकांची गैरसोय होते. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने आपल्या काही आगारांमध्ये वाहनतळांची व्यवस्था केली आहे. या वाहनतळांवर १२ तास अवजड वाहन उभे करण्यासाठी १०० रुपये अधिक सेवाकर असे शुल्क आकारले जाते. तर हलक्या वाहनासाठी ७५ रुपये अधिक सेवाकर असे शुल्क घेण्यात येत आहे. मात्र या दरांमध्ये दुपटीने वाढ करण्यात येणार आहे. १२ तास अवजड वाहन उभे करण्यासाठी २०० रुपये आणि सेवाकर असे, तर हलक्या वाहनांसाठी १५० रुपये आणि सेवाकर असे शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी या वाहनतळांवर महिनाभर अवजड वाहन उभे करण्यासाठी २५०० रुपये, तर हलक्या वाहनांसाठी २००० रुपये शुल्क अधिक सेवाकर घेण्यात येत होते. भविष्यात त्यासाठी सेवाकरासह अनुक्रमे ५००० रुपये व ४००० रुपये मासिक शुल्क घेण्याचा बेस्टचा विचार आहे. त्याचबरोबर आता या वाहनतळांवर मोटारसायकल, स्कुटर १२ तास उभ्या करण्यासाठी ७५ रुपये अधिक सेवाकर असे शुल्क आणि मासिक शुल्कापोटी २००० रुपये अधिक सेवाकर अशी आकारणी करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे सादर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही बेस्ट समितीने या प्रस्तावावर विचार केलेला नाही. मात्र नजिकच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आगारांमधील पार्कीगही महागणार आहे.