गेले आठ महिने दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुरातन वास्तूंचे दर्शन घडविणाऱ्या हेरिटेज टूरमधून बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. हेरिटेज टूरमधून सुमारे ७४ हजार पर्यटकांनी पुरातन वारसा वास्तूंचे दर्शन घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेस्ट उपक्रमाने पर्यटकांसाठी ३ नोव्हेंबर २०२१ पासून दक्षिण मुंबईत खुल्या दुमजली बसमधून पर्यटन सेवा सुरू केली. दर शनिवार आणि रविवारी सायंकाळी ६.३० व रात्री ८ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथून दोन बस सोडण्यात येतात. या पर्यटन सेवेला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर नरिमन पॉईंट येथून दुपारी ३ आणि सायंकाळी ५ वाजता दोन अतिरिक्त बस फेऱ्या सुरु करण्यात आल्या. २७ नोव्हेंबर २०२१ पासून फक्त शनिवार आणि रविवार या दिवशी सकाळी ९.३० आणि ११ वाजता दोन अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येऊ लागल्या. मात्र वाढलेल्या उकाड्यामुळे पर्यटन बसच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १७ मार्चपासून आठवडयातील सर्व दिवस सायंकाळी ५ वाजल्यापासून मध्यरात्री उशिरापर्यंत पर्यटन बस सेवा उपलब्ध करण्यात आली.

प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधान भवन, एन.सी.पी.ए, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हॉनिर्मल सर्कल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररी, जुने कस्टम हाऊस ही ठिकाणे पर्यटकांना दाखविण्यात येत आहेत. ही सफर दुमजली खुल्या बसमधून घडविण्यात येत आहे. अपर डेकमधून प्रती व्यक्ती प्रवासासाठी १५० रुपये आणि लोअर डेक प्रती व्यक्ती ७५ रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येते.

बेस्टच्या या पर्यटन सेवेला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठ महिन्यात ७४ हजार ७४४ पर्यटकांनी पुरातन वारसा वास्तू पर्यटनाचा आनंद घेतला. बेस्ट उपक्रमाला यातून एक कोटी ११ लाख ८३ हजार ७७५ रुपये उत्पन्न मिळाले आहे. या सेवेत १७ मार्चपासून बदल केल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. एप्रिल २०२२ मध्ये १३ हजार ८२७, मे मध्ये २१ हजार ४५६ आणि जूनमध्ये १६ हजार ६९२ पर्यटकांनी पुरातन वारसा वास्तूची सफर केली. मार्चमध्ये हीच संख्या सात हजार १२९ इतकी होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best earns rs 1 crore from heritage tour mumbai print news amy
First published on: 06-07-2022 at 14:50 IST