मुंबई : दिवाळी बोनससह इतर मागण्यांसाठी ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांनी रविवारी अचानक ‘काम बंद’ची हाक दिल्याने भाऊबीजेनिमित्त नातलगांकडे निघालेल्या मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. चालक, वाहक आणि इतर कर्मचारी रविवारी सकाळपासूनच संपावर गेले. या आंदोलनाला कोणत्याही कर्मचारी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला नव्हता.

रविवारी बेस्ट उपक्रमाच्या मागाठाणे आगारातील कर्मचाऱ्यांनी काम करणे अचानक बंद केले. अन्य काही आगारांमध्याही बंदचा परिणाम झाला. बॅकबे, प्रतीक्षानगर, गोराई आगारांत कर्मचाऱ्यांची उपस्थिती तुरळक होती. त्यामुळे या आगारातून ये-जा करणाऱ्या बसवर परिणाम झाला. मात्र मागाठाणे वगळता अन्य आगारांत कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असल्याचा दावा ‘बेस्ट’ उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून करण्यात आला. दुसरीकडे हे आंदोलन एक दिवसापुरते असून सोमवारी सेवा सुरळित सुरू राहील, अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर

कामगार संघटनांत वाद

या संपावरून कामगार संघटनांमध्ये वाद निर्माण झाला आहे. भाजपप्रणीत पाच संघटनांनी कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलनासाठी सहकार्य केल्याचा आरोप बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला. कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी शासनाने तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे. मात्र, भाऊबीजेच्या दिवशी बंद करून प्रवाशांना नाहक त्रास देणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. तर महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला, मात्र ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड खदखद निर्माण झाल्याचे दि बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमातील सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना १९७०-७१ पासून दिवाळी सणापूर्वी बोनस देण्यात येतो. मात्र यंदाच्या दिवाळी संपत आली तरीही ‘बेस्ट’च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला नाही. याची चौकशी करून, दोषींवर कारवाई करावी, असे पत्र दि बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांना शनिवारी पाठवले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांनी काम बंदची हाक दिली.

शशांक राव भाजपमध्ये आहेत. रविवारी कामावर न जाण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्यास कोणतीही भाजप संघटना त्यांना मदत करणार नाही. – सुहास सामंत, अध्यक्ष, बेस्ट कामगार सेना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोनससाठी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करू नये, अशी सामंत यांची अपेक्षा असेल तर, त्यांनी बोनस मिळवून दिला नाही? जाणूनबुजून बोनस देण्यात येत नसेल, तर आयुक्तांनी योग्य कार्यवाही करावी. – शशांक राव, सरचिटणीस, दि बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस