मुंबई : मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ॲण्ड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) प्रशासनाने बसचे भाडे दुप्पट केले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांना दुप्पट बसभाड्याचा फटका बसला. अनेकांना या भाडेवाढीबद्दल कल्पना नव्हती. त्यामुळे वाहकांशी हुज्जत घालत प्रवाशांनी बेस्टला लाखोली वाहिली. भाडेवाढीमुळे पहिल्याच दिवशी बेस्टची प्रवासी संख्या रोडावल्याचेही काही ठिकाणी जाणवत होते. मात्र भाडेवाढीचा खरा परिणाम येत्या काही दिवसांतच निदर्शनास येईल.

बेस्ट उपक्रमाने बसच्या प्रवासी भाड्यात शुक्रवारपासून वाढ केली. सर्वसाधारण बसचे किमान भाडे ५ रुपयांवरून १० रुपये, तर वातानुकुलित बसचे किमान भाडे ६ रुपयांवरून १२ रुपये करण्यात आले. त्याचबरोबर मुंबईच्या हद्दीबाहेत जाणाऱ्या बस प्रवाशांना वाढलेले बसभाडे आणि त्यावर २ रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. एकदम दुपटीने भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांमध्ये पहिल्याच दिवशी नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक प्रवाशांना बेस्टच्या भाडेवाढीबद्दल कल्पना नव्हती. त्यामुळे बसमध्ये चढल्यावर तिकीट काढताना भाडेवाढ झाल्याचे ऐकून अनेक प्रवाशांना धक्काच बसल्याचे दिसत होते. काही बस स्थानकांवर प्रवासी भाडेवाढीवरून वाहकांबरोबर हुज्जत घालताना दिसत होते.

सुट्ट्या नाण्यांवरून वाद

बेस्टचे प्रवासी भाडे पाच रुपये व सहा रुपये होते. तेव्हा सुट्टे पाच रुपये देणे प्रवाशांना सोपे होत होते. तर बेस्टकडे मोठ्या प्रमाणावर पाच रुपयांची नाणी जमा होत होती. आता नव्या भाडेवाढीमुळे दोन रुपये आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा खच बेस्टकडे वाढणार आहे. पहिल्याच दिवशी प्रवासी आणि वाहक यांच्यात सुट्ट्या पैशांवरूनही वाद होत होते. २० रुपये दिल्यास ८ रुपये परत घेणे किंवा १५ रुपये दिल्यावर ३ रुपये परत देणे हे वाहकांसाठीही गोंधळाचे झाल्याचे दिसत होते.

लाडक्या बहिणींसाठी भाडेवाढ

भाडेवाढ झाल्यामुळे प्रवाशांनी बेस्ट प्रशासनावर चांगलेच तोंडसुख घेतले. मात्र प्रवाशांच्या या टोमण्यांना वाहकांनाच सामोरे जावे लागत होते. आधी गाड्या वाढवा, मग भाडे वाढवा असे टोमणे प्रवासी मारत होते. तर सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘लाडकी बहिण योजने’साठी निधी उभारण्यासाठीच ही भाडेवाढ केल्याचाही आरोपही अनेक प्रवासी करीत होते.

पायी प्रवास बरा

एक दोन किमीच्या प्रवासासाठी १२ रुपये देणे महाग वाटत असल्यामुळे अनेक प्रवाशांनी पायी प्रवास करणे पसंत केले. सिद्धिविनायक मंदिरासाठी वरळी कोळीवाड्यातून निघालेल्या एका प्रवाशाने सांगितले की, फक्त १ किमी अंतरासाठी १२ रुपये देणे योग्य वाटत नाही, म्हणून मी आज चालतच देवळात गेलो.

शेअर टॅक्सीवाल्यांचा धंदा जोरात

शेअर टॅक्सीला प्रोत्साहन देण्यासाठीच बेस्टचे भाडे वाढवण्यात आल्याचाही आरोप काही प्रवासी करीत आहेत. समाजमाध्यमांवरूनही हा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी शेअर टॅक्सी १५ रुपये आकारते, तिथे बेस्टसाठी आता १२ रुपये द्यावे लागणार आहेत. मात्र आतापर्यंत बसगाडीसाठी थांबणारे प्रवासी यापुढे शेअर टॅक्सीचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे.

बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या – ३१.५ लाख
दैनंदिन उत्पन्न – १.७५ कोटी रुपये
मासिक उत्पन्न – ५० ते ६० कोटी रुपये

प्रवासी उत्पन्न वार्षिक – ६८० कोटी रुपये

बेस्टच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या – २७८४

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वमालकीच्या बसगाड्या – ६६५