मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई शहर आणि उपनगरांतील विविध समुद्रकिनारे, तसेच पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होते. या पर्यटकांच्या सुविधेसाठी बेस्ट उपक्रमातर्फे वर्षाअखेरीस मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करणे सोयीचे होईल.

हेही वाचा >>> वर्षाअखेरीस रेल्वेची तिकीट आरक्षण प्रणाली बंद; प्रवाशांची अडचण होणार

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई समुद्र किनारा, मार्वे समुद्र किनारा आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱ्यांवर जाणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे विविध बसमार्गांवर रात्री एकूण २५ जादा बस सोडण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार अधिक बस सोडण्यात येतील. प्रवाशांच्या मदतीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई समुद्र किनारा, चर्चगेट स्थानक (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी वाहतूक अधिकारी, बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> अवघ्या १० रुपयात आरोग्य तपासणी व उपचार! अडीच लाख रुग्णांची वर्षाकाठी तपासणी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमातर्फे ३१ डिसेंबर रोजी दक्षिण मुंबईतील विविध ऐतिहासिक, तसेच प्रेक्षणीय स्थळांचा फेरफटका नवीन वातानुकूलित दुमजली विद्युत बसद्वारे घडविण्याच्या हेतूने ‘हेरिटेज टूर’ चालविण्यात येणार आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) – गेट वे ऑफ इंडिया – मंत्रालय – एनसीपीए – नरिमन पॉईंट – विल्सन महाविद्यालय – नटराज हॉटेल – चर्चगेट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुतात्मा चौक – रिझर्व बँक – ओल्ड कस्टम हाऊस – म्युझियम या मार्गावरून सकाळी १० ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत प्रत्येक ४५ मिनिटांनी बसगाडी धावेल. ‘हेरिटेज टूर’साठी वरच्या मजल्यासाठी प्रत्येकी १५० रुपये आणि खालच्या मजल्यावर प्रत्येकी ७५ रुपये तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. दोन्हीही अतिरिक्त बस सेवांचा जास्तीत जास्त लाभ प्रवासी, पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे केले आहे.