लांबणीवर पडलेल्या प्रकल्पाला अखेर मुहूर्त;  मुंबई ते अलिबाग अंतर आता पाऊण तासात

जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या भाऊचा धक्का ते मांडवा ही रोल ऑन रोल आऊट (रोपॅक्स) सेवा येत्या दीड महिन्यात सुरू होणार असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी स्पष्ट केले.  मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे दाखल झालेल्या कोस्टा क्रूझ जहाजाच्या मुंबईत दाखल होण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या या प्रकल्पाला अखेर मुहूर्त मिळाला असून यामुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर आता पाऊण तासात पार करता येणार आहे.

महाराष्ट्र सागरी महामंडळ (एमएमबी), मुंबई पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) या तीन यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने रोरो (मालवाहतूक ) ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला  योजनेअंतर्गत सागरी वाहतुकीस वाव मिळण्यासाठी ३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या अंतर्गत बंदरांवर पायाभूत सुविधाही निर्माण करण्यात आलेल्या आहेत.

रोपॅक्स सेवेतून एका फेरीत ३०० प्रवासी आणि ४० वाहने नेण्याची क्षमता जहाजात असणार आहे. यामुळे मुंबई ते अलिबाग हा अडीच तासाचा प्रवास पंचेचाळीस मिनिटावर येणार आहे.

सध्या भाऊचा धक्का ते मांडवा अशी फेरीबोट सुरु असून पाऊण तासात मांडव्याला पोहोचता येते. या प्रवासासाठी १९० रुपये एवढा दर आकारला जातो. रोपॅक्स (मालवाहतूक) या सेवेमुळे  अलिबाग, मुंबई आणि रायगड जिल्ह्य़ातील गावांना तसेच रहिवाशांना याचा फायदा होणार आहे.

जलपर्यटनाला देशातून चांगला प्रतिसाद

मुंबईत कोस्टा क्रू झ हे जहाज दाखल झाले असून यातून मुंबई ते मालदीव अशी सेवा सुरु करण्यात आली आहे. या प्रसंगी शुक्रवारी आयोजित  करयक्रमात जेएनपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया, कोस्टाच्या भारतातील प्रतिनिधी नलिनी गुप्ता आणि जलवाहतूक मंत्रालय विभागाचे मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. या कार्यक्रमात जलपर्यटनाला देशातून चांगला प्रतिसाद मिळत असून २०१५ मध्ये मुंबईत ४० जहाजे होती तर

या वर्षांत २५९ जहाजे येतील असे मत मालवीय यांनी व्यक्त केले. कोस्टातर्फे कोचीन – मालदीव, मुंबई – कोचीन, मुंबई ते मालदीव आणि मालदीव ते मुंबई असा प्रवास सुरु करण्यात येणार आहे. सात दिवसांचा हा प्रवास असून नागरिकांना आरामदायक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. मुंबई ते मालदीव या सात दिवसाच्या प्रवासात नवीन मंगळूर, कोची येथे थांबणार आहे.