मुंबई : भारताची शक्ती आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत. ”ऑपरेशन सिंदूर”नंतर भारताची एक नवीन ओळख संपूर्ण जगाला झाली आहे, असे गौरवोद््गार महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान काढले. ऑपरेशन सिंदूरमुळे निर्माण झालेली ओळख अधिक समर्थपणे पार पाडण्यासाठी आपण शपथ घेऊ या. महानगरपालिका मुंबईकरांच्या सेवेमध्ये सातत्याने प्रयत्न करत असते. सर्व मुंबईकरांचे प्रेम महानगरपालिकेला सदैव लाभू देत, असेही त्यांनी नमूद केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या सुरुवातीला महानगरपालिका मुख्यालयासमोरील सर फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास गगराणी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापौर कार्यालयात कै. वासुदेव बाळकृष्ण वरळीकर यांच्या तैलचित्राला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. दरम्यान, महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल आणि सुरक्षा पथकाने मानवंदना दिली.
या सोहळ्यात राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्वक सेवा पुरस्कार जाहीर झालेल्या मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भारताच्या राष्ट्रपतींकडून गुणवत्तापूर्वक सेवेसाठी महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाचे वरिष्ठ केंद्र अधिकारी संतोष रावसाहेब इंगोले, अग्निशामक सुनील सुरेश देसले आणि अग्निशामक योगेश हनमंत कोंडावार यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. भूषण गगराणी यांच्या हस्ते या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, ”महानगरपालिका वार्षिक प्रकाशन २०२५’ या पुस्तिकेचे गगराणी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महानगरपालिका सचिव खात्याकडून दरवर्षी ही पुस्तिका तयार केली जाते.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, सहआयुक्त, उप आयुक्त, संचालक, सहायक आयुक्त, खातेप्रमुख आदी उपस्थित होते.