उत्पन्न वाढविण्यासाठी शक्कल ; प्री-वेडिंग’ छायाचित्रण किंवा चित्रीकरणासाठीही भाडय़ाने देणार
मुंबई : सहा वर्षे उलटत आल्यानंतरही प्रवासी संख्या आणि उत्पन्नाच्या बाबतीत तोटय़ात चाललेल्या मोनो रेल्वेला सावरण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नवी शक्कल लढवली आहे. प्रवासी नसल्याने रिकामी धावत असलेली ‘मोनो’ वाढदिवस, लग्नसमारंभ आयोजित करण्यासाठी तसेच ‘प्री-वेडिंग’ छायाचित्रण किंवा चित्रीकरण तसेच मुंबईदर्शन यात्रेसाठी भाडय़ाने देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
मोनो रेल्वेचा पहिला टप्पा वडाळा ते चेंबूर हा २०१४ मध्ये कार्यरत झाला, तर २०१९ मध्ये संत गाडगे महाराज चौक ते वडाळा हा टप्पादेखील कार्यरत झाला. मोनो सेवेचा विस्तार झाला असला तरी उपलब्ध रेकची मर्यादित संख्या आणि सुटय़ा भागांची कमतरता यामुळे मोनो रखडतच सुरू आहे. मोनोचे संचालन करणारी स्कोमी कंपनी दिवाळखोरीत निघाली असून, सध्या याचे संचालन एमएमआरडीमार्फतच केले जाते. मोनोच्या प्रवासी संख्येतदेखील वाढ होत नसून, उत्पन्नवाढीसाठी अन्य पर्याय चाचपून पाहिले जात आहेत.
लवकरच वाढदिवस, लग्नसमारंभ, प्री-वेडिंग छायाचित्रण आणि मुंबईदर्शन अशा कार्यक्रमांसाठी मोनो उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. यासाठी भाडे आकारणी आणि इतर बाबींचे पर्याय तपासून पाहिले जात असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यक्रमांसाठी मोनो उपलब्ध करून देताना साधारण दीडपट भाडे आकारले जाईल, तसेच ही सुविधा गर्दीचा कालावधी (सकाळ आणि सायंकाळ) वगळून दिली जाईल. धावत्या मोनोमध्ये प्री-वेडिंग छायाचित्रीकरणाची सुविधा द्यायची असेल तर काही वेळा मोनो रेल्वे थांबवावी लागेल. तसेच जर संपूर्ण रेकच भाडय़ाने हवा असेल तर तशी सुविधादेखील दिली जाईल. त्यानुसार प्रतीक्षा कालावधी धरून, त्या काळातील एकूण सेवाफेऱ्यांनुसार दीडपट भाडे आकारले जाईल. मोनो मार्गिकेच्या टप्प्यात काही ठिकाणी आजूबाजूस उंच इमारतींची पार्श्वभूमीदेखील आहे, याचा फायदा प्री-वेडिंग छायाचित्रणासाठी होऊ शकतो. अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मुंबईदर्शनसाठी सध्या दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांवरच भर दिला जातो. पण मोनोमधून बंदर भागातील मुंबई आणि मध्य मुंबईचे दर्शन होऊ शकते. त्यानुसार रविवारच्या दिवशी मोनोमधून मुंबईदर्शनचा पर्यायदेखील उपलब्ध करून देण्याची योजना विचाराधीन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एखाद्या ठिकाणी अग्निकांड घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.
मोनोची प्रवासी संख्या
* मार्च २०१९ मध्ये मोनोचा सेवा विस्तार झाल्यानंतर वर्षभरात ३.६० कोटी प्रवासी मोनोमधून प्रवास करणे अपेक्षित होते, मात्र मार्च २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२० दरम्यान प्रत्यक्षात सुमारे ३८ लाख प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आणि ७.२९ कोटींचे उत्पन्न मिळाले.
* सेवा विस्तार झाल्याच्या महिन्यात साडेपाच लाख प्रवाशांनी मोनोमधून प्रवास केला, पण नंतर या संख्येला उतरती कळा लागली. दर महिन्याला दोन ते तीन लाख प्रवासी याचा लाभ घेत आहेत.
* सध्या २३ मिनिटांच्या अंतराने मोनो सेवा उपलब्ध असून दुपारच्या वेळी मोनो जवळपास रिकामीच धावते. मात्र गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे वाहतुकीचे इतर पर्याय ठप्प झालेले असताना, काही वेळा प्रवाशांना मोनोचा फायदा झाला.