मुंबईतील वाहतुकीच्या समस्येवर तोडगा ठरू शकणारा प्रकल्प म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी कोस्टल रोड प्रकल्पासंदर्भात कॅगनं एप्रिल महिन्यात सादर केलेल्या अहवालात नमूद केलेले मुद्दे सादर केले. कोस्टल रोड प्रकल्पामध्ये कंत्राटदार आणि सल्लागारांना फायदेशीर ठरतील अशा पद्धतीने निर्णय घेतले गेले आणि त्यांच्या बिलांचे पैसे दिले गेले, असा आरोप कॅगच्या अहवालातील तरतुदींच्या आधारावर आशिष शेलार यांनी केला. तसेच, पर्यावरण मंत्र्यांनी यासंदर्भात खुलासा करण्याची देखील मागणी आशिष शेलार यांनी केली.
“कोस्टल रोडसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पात मुंबई महानगर पालिका ठरवून अफरातफर करतेय असा आमचा आरोप आहे. प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांना बेकादेशीर मदत केली जात आहे. अनाकलनीय अशा पद्धतीने त्यांची बिलं आणि पैसे दिले जात आहेत. पालिकेनं सांगितलं असं काहीही नाही. मात्र, कॅगनं अहवालात सांगितलंय की मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात बेकायदेशीररीत्या बिलं दिली जात आहेत. कंत्राटदार-कन्सल्टंट्सला विशेष मदत केली जात आहे. मुंबईकरांच्या पैशांची लूट केली जात आहे. हा सगळा प्रकार भ्रष्टाचाराच्या दिशेने जात आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.
पर्यावरण मंत्र्यांना माझा सवाल आहे की…
दरम्यान, या मुद्द्यावरून आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधत त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. “समुद्रात भराव टाकून तयार करण्यात येणाऱ्या जमिनीचा वापर निवासी किंवा व्यावसायिक वापरासाठी होणार नाही, असं हमीपत्र केंद्रीय पर्यावरण विभागानं मागितलं होतं. पर्यावरण मंत्र्यांना माझा सवाल आहे की केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मागितलेलं हमीपत्र २८ महिने उलटून गेल्यानंतरही का देण्यात आलेलं नाही?” असं आशिष शेलार म्हणाले.
यामागचा छुपा अजेंडा काय?
दरम्यान, पालिकेकडून केंद्रीय पर्यावरण विभागाला उत्तर देण्यात केला जाणारा उशीर म्हणजे छुपा अजेंडा असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला. “कोस्टल रोडसाठीच्या या जागेवर अतिक्रमण होणार नाही यासाठीचा प्रिव्हेंशन प्लॅन केंद्रानं मागितला होता. पण ३२ महिन्यांनंतर देखील अत्याप तो प्लॅन देण्यात आलेला नाही. यामागचा छुपा अजेंडा काय आहे? या नव्याने तयार होणाऱ्या जागेवर दुसरं काहीतरी अनधिकृत करण्याचं नियोजन महापालिकेचं नाही ना? यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे”, असंही आशिष शेलार म्हणाले.