मुंबई: कौशल्यविकासमंत्री नबाव मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या विरोधकांनी गुरूवारी विधिमंडळाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. राज्याचे एक मंत्री तुरुंगात असूनही त्यांचा राजीनामा घेतला नाही. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत आर्थिक व्यवहार करून मलिक यांनी मुंबईरांशी गद्दारी केली असून त्यांची त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी करीत विरोधकांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी करीत सरकारला धारेवर धरले.

विधानसभेत कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. फडणवीस यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेचा मुद्दा उपस्थित करताच भाजपच्या सदस्यांनी फलक फडकवत आणि जोरदार घोषणाबाजी करीत मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जे कधीही इतिहासात घडले नाही, ते महाराष्ट्रात घडते आहे. मंत्री मलिक तुरुंगात आहेत. त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही वा त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्याच्यावर आरोप साधा नाही, तर मुंबईच्या मारेकऱ्यांशी आर्थिक व्यवहार झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी एका मिनिटात अशा मंत्र्याला बाहेर फेकले असते. मलिक यांनी दाऊदच्या बहिणीशी हसिना पारकरशी व्यवहार केला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांना आक्षेप घेत ते कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. या गोंधळातच सरकारने दिवसाचे कामकाज उरकले.

विधान परिषदेतही गोंधळ

देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि बॉम्बस्फोटातील आरोपी शाहवली खान व सलील यांच्याशी जागेचा व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांची देशद्रोही प्रवृत्ती जनतेपुढे उघड झाली असून त्यांची पाठराखण करणा-या सरकारचा धिक्कार विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केला. राजीनाम्याच्या मागणीवरुन विधानपरिषदेतही विरोधकांनी गदारोळ केला आणि नवाब मलिक मंत्रीपदाचा राजीनामा देत नाही, तोपर्यंत भाजपचा एल्गार सुरुच राहणार, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

भाजपचा ९ मार्चला मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नबाव मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक असून ९ मार्चला आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, यांच्यासह प्रमुख नेते मोर्चात सहभागी होणार आहेत. मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.