“…यालाच तोंडाची वाफ म्हणतात”, फडणवीसांचे आभार मानणारं आदित्य ठाकरेंचं ट्वीट शेअर करत भाजपाचा हल्लाबोल

भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तोंडातून वाफा काढण्याच्या टीकेला प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

devendra fadnavis on uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपावर टीकास्त्र डागलं आणि ‘आम्ही फक्त तोंडाची वाफ काढत नाही, तर जे बोलतो ते करतो’ असं म्हटलं. यावर भाजपाने प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. तसेच मुख्यमंत्री ठाकरे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता पुन्हा नव्याने घोषणा करत आहे, असा आरोप केला.

भाजपाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता पुन्हा नव्याने घोषणा करणे यालाच तोंडाची वाफ म्हणतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त श्रेय लाटण्यासाठी आपण सत्तेत आलात का?”

भाजपाकडून फडणवीसांचे आभार मानणारं आदित्य ठाकरेंचं ट्वीट शेअर

भाजपाने आपल्या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे यांचं ८ मार्च २०१९ रोजीचं एक ट्वीट देखील पोस्ट केलंय. यात आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं, “वचनपूर्ती. मालमत्ता कर मुक्त मुंबईकर. ५०० चौरस फुटापर्यंत असणाऱ्या घरांना आता मालमत्ता कर नाही. शिवसेनेची वचनपूर्ती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार.”

“एकच निर्णय पुन्हा पुन्हा जाहीर करण्याची गरज काय?”

या ट्वीटमध्ये भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फडणवीस सरकारच्या कामाचं श्रेय घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच एकच निर्णय पुन्हा पुन्हा जाहीर करण्याची गरज काय? असा सवाल विचारला. याशिवाय फडणवीस सरकारच्या काळात हा निर्णय कधी घेतला याची माहितीही दिली.

भाजपाच्या पोस्टरनुसार, “६ जुलै २०१७ रोजी मुंबई महापालिकेत ५०० चौरस फुटापर्यंतचा मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव पास झाला. ८ मार्च २०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ जानेवारी २०१९ पासून मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या मालमत्तेवर करमाफीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून घेतला. यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. आता १ जानेवारी २०२२ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय जाहीर केला.”

हेही वाचा : “आम्ही तोंडातून वाफा काढत नाही, जे बोलतो ते करतो”; मुंबईकरांसाठी मोठी भेट देत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

दरम्यान, भाजपा नेते सदाभाऊ खोत यांनी देखील या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. ते म्हणाले, “मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमता कर माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. चला चला मुंबई महानगर पालिकेची निवडणूक आली. देवेंद्र फडणवीस केलेल्या कामाचं श्रेय घेण्याची वेळ आली,”

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp criticize uddhav thackeray by sharing old tweet of aaditya thackeray over property tax pbs

Next Story
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्य सरकार १ जानेवारीपासून केवळ इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी