मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्याशेजारी बसून युतीच्या चर्चा करीत असल्याचे पाहून अचंबित झाल्याचा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला आहे. त्याचबरोबर करोनाकाळात प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मोदीविरोधी पक्षांचे ऐक्य घडविण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची पाटणा येथे शुक्रवारी बैठक झाली. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘मोदी हटाव’ यासाठी विरोधक एकवटले असले, तरी वास्तविक परिवार वाचविण्यासाठी ही आघाडी तयार करण्यात येत आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावरून भाजपवर सातत्याने टीका केलेले उद्धव ठाकरे हे आज मेहबूबा मुफ्ती यांच्याशेजारी बसूनच युतीची चर्चा करीत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नऊ वर्षांत जी कामगिरी केली आहे, त्यामुळे देशातील जनता आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्यामागे ताकदीने उभी राहील, याची जाणीव झाल्याने विरोधकांनी ऐक्य घडविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत; पण कितीही मेळावे व बैठका घ्या, त्याने काहीच फरक पडणार नाही. हे प्रयोग २०१९ मध्येही झाले होते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना सोडणार नाही’

मुंबई महापालिकेतील करोनाकाळातील गैरव्यवहाराची चौकशी ‘ईडी’ने सुरू केली असून वरिष्ठ सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना फडणवीस म्हणाले, करोनाकाळात प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यांना सोडणार नाही. मुंबई महापालिकेतील करोनाकामातील गैरव्यवहाराची चौकशी करताना अधिकाऱ्यांना ‘लक्ष्य’ केले जाणार नाही. मात्र गैरव्यवहार झाल्याचे उघडपणे दिसत आहे. त्यामुळे काही अधिकाऱ्यांची चौकशी करून माहिती घ्यावी लागेलच.