मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना हिंदुत्वावर आक्रमक भूमिका मांडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना उत्तर प्रदेशमध्ये विकास झाल्याचं म्हटलं. यानंतर भाजपा नेत्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यशी सहमती दर्शवली तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरुन टीका केली. शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे ही भाजपाची सी टीम असल्याची टीका केली होती. यावर आता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

“आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे. मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

फडणवीसांचं उत्तर –

आदित्य ठाकरेंच्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता फडणवीसांनी शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीची कितवी टीम आहे? अशी विचारणा केली. “माझा शिवसेनेला सवाल आहे की तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीची कितवी टीम आहात. सी, बी, डी की झेड आहात. एक मुख्यमंत्रीपद घेऊन संपूर्ण पक्षाची काय अवस्था केली आहे. आधी आपलं पहा. आपलं ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे जरा बंद करा”, असा टोला फडणवीसांनी लगावला.

संजय राऊतांवर टीका –

काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर केली आहे. संजय राऊत लक्ष वेधून घेण्यासाठी सर्व बोलत आहेत असंही ते म्हणाले. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि मराठी माणसाला लुटायचं हा धंदा मुंबईत कोण करतंय हे आता स्पष्ट होत आहे अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

काका राज ठाकरेंच्या टीकेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले “मी आधी टाइमपास टोळी म्हणायचो, पण आता बरं वाटतंय की…”

“आमच्या अनेक नेत्यांच्या घरात माणसे घुसवत मापं घेण्यात आली, नसलेल्या नोटीसी देण्याचं काम झालं. तरी आम्ही कायद्याने मुकाबला करण्याची भूमिका घेतली. जे काही पुरावे आहेत त्याच्या आधारे नोटीस दिली असून कायदेशीर नोटीस मिळाली असताना कायद्याने उत्तर दिलं पाहिजे. भावनिक उत्तर दिल्यास त्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.

पत्रावाला चाळ गरिब मराठी माणसाचा प्रश्न होता. अनेक वर्ष हा प्रश्न भिजत पडला. ज्यांनी स्वत:ला गरिब माणसांचा मसिहा घोषीत केलं, त्यांनीच गरिबांचे इंटरेस्ट बिल्डरांच्या घशात घातले असा आरोपही फडणवीस यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, “मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि मराठी माणसाला लुटायचं हा धंदा मुंबईत कोण करतंय हे आता स्पष्ट होत आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संजय राऊतांनी यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केलेले आरोप हास्यास्पद असल्याचं फडणवीस म्हणाले. “ते कोणत्याच आरोपाचा पुराव देऊ शकले नाहीत. राज्य सरकारकडून सोमय्या आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की चुकीची कारवाई करता येणार नाही,” असेही ते म्हणाले. काळजी करायचं कारण नाही, कारण कितीही दाबावाची कारवाई केली तरी सोमय्या बोलायचे बंद करणार नाहीत, असंही फडणवीस म्हणाले.