देशव्यापी पक्षविस्ताराचे शिवसैनिकांना आवाहन

मुंबई : हा देश आपल्या अधिपत्याखाली हवा, या भूमिकेतून केंद्रातील सत्ता गाजवली जात असून, आज आपण गप्प बसलो तर देश म्हणून गुलामगिरीत जाऊ, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपची ही आणीबाणी मोडून काढायची तर दिल्लीत शिवसेनेसारखा पक्ष हवा. त्यासाठी इतर राज्यांतही शिवसेना वाढवण्यासह महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकण्याच्या जिद्दीनेच लढूया, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत आदी यावेळी उपस्थित होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रास्ताविक केले. ‘‘दिल्ली काबीज करण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणार की नाही? ते पूर्ण करणार नसू तर या सगळय़ाला अर्थ नाही’’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बाबरी मशीद पडली त्याचवेळी देशभरात शिवसेनेच्या हिंदूुत्वाची लाट होती. त्याचवेळी देशभरात पक्ष वाढवला असता तर शिवसेनेचा पंतप्रधान असता, असे विधानही ठाकरे यांनी केले.

‘‘हिंदूुत्वासाठी सत्ता अशी शिवसेनेची भूमिका आहे. पण, सत्तेसाठी हिंदूुत्वाचा वापर शिवसेनेने कधीही केला नाही. समर्थ हिंदूुस्थानचे शिवसेनेचे स्वप्न आहे. पण, देशाला आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी हिंदूुत्वाचा वापर हे भाजपचे धोरण आहे. आज आपण ग्प्प बसलो तर देशात गुलामगिरी सुरू होईल’’, असे टीकास्त्र सोडत भाजपची आणीबाणी मोडायची तर शिवसेनेसारखा पक्ष दिल्लीत हवा, असे ठाकरे म्हणाले. त्यासाठी इतर राज्यांत शिवसेना वाढवण्याबरोबरच बॅँकांसारख्या सहकारी संस्थांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभेपर्यंतची प्रत्येक निवडणूक ही जिंकायचीच या जिद्दीने लढवावी लागेल. हजारो गाणी लोकप्रिय झाल्यानंतरही प्रत्येक गाणे हे पहिले गाणे समजून मेहनत करून गाते, असे उत्तर प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी दिल्याचे उदाहरण देत प्रत्येक निवडणूकही त्याच पद्धतीने आपल्याला लढवावी लागेल. फाजील आत्मविश्वास दूर ठेवावा लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

‘‘जर एका विषाणूची लाट येत राहते तर मग तेजस्वी विचार असलेल्या शिवसेनेची लाट का नाही येऊ शकत? लवकरच बाहेर पडणार आणि महाराष्ट्र पिंजून काढणार. जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत त्यांना भगव्याचे तेज दाखवणार. हे काळजीवाहू विरोधक पूर्वी मित्र होते ही खंत. कारण आपणच त्यांना पोसले. आपली २५ वर्षे युतीमध्ये सडली. यांना राजकारणाचे गजकर्ण झाले आहे’’, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले.

‘‘वापरा आणि फेकून द्या हे भाजपचे धोरण आहे. ममता, जयललिता, शिवसेना, अकाली दल यांच्याशी युती करून त्यांनी एकेकाळी सत्ता मिळवली. नंतर सर्वाना बाजूला सारले. आता एनडीएत यापैकी कोणीही उरलेले नाही. भाजपचे नवहिंदूुत्ववादी हिंदूुत्वाचा वापर केवळ स्वार्थासाठी करत आहेत. सोयीप्रमाणे बदलणारे हिंदूुत्व आमचे नाही. सत्तेसाठी संघमुक्त भारत म्हणणारे नितीशकुमार, काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती यांच्याशी युती हे भाजपचे राजकारण. काश्मीर ते कन्याकुमारी एक धोरण ठेवून दाखवा’’, असे आव्हानही त्यांनी दिले.

‘युतीमध्ये लढून वेगळे झालात हा लोकशाहीचा अपमान’ या भाजप नेत्यांच्या टीकेलाही ठाकरे यांनी उत्तर दिल़े  ‘‘आम्हाला गुलामासारखे वागवण्याचा तुमचा डाव उलटून टाकला व कॉंग्रेस राष्ट्रवादीशी युती केली. अंधारात युती केली नाही’’, असा टोला लगावत तुम्ही अनेक ठिकाणी सरकार पाडून, आमदार फोडून सत्ता आणली ही कुठली लोकशाही’’, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपवर विश्वास टाकला, पण त्यांनी विश्वासघात केला. आपल्याला संपवायला गेले, त्यामुळे उलटून पंजा मारावा लागला, असेही ते म्हणाले.

‘संस्थात्मक काम उभे करा’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आजवर आपण फार गंभीरपणे लक्ष दिले नाही. माझेही दुर्लक्षच झाले. पण, आता पक्षाची ताकद वाढवायची तर बँकांपासून ग्रामपंचायती, नगरपंचायती अशा सर्व निवडणुका जिद्दीने लढवायच्या आहेत. आपले सहकारी पक्ष संस्थात्मक कामातून पक्ष उभारतात व त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवतात. आपणही त्यातून शिकले पाहिजे. राज्यातील सत्ता आपल्याकडे आहे, या संधीचे सोने करा आणि संस्थात्मक काम उभे करा, सहकारी संस्था उभारा, असा पक्षबांधणीचा नवीन कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.

‘ईडी, सीबीआय बाजूला ठेवून लढा’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकटय़ाने लढण्याची आमची तयारी आहे. पण, ही लढाई करताना तुमच्या ईडी, सीबीआय यंत्रणा बाजूला ठेवा. हिंमत असेल तर शिवसैनिकांशी निवडणुकीच्या मैदानात लढून दाखवा, असे प्रतिआव्हान ठाकरे यांनी भाजपला दिले.