आज राज्यात आव्हान आणि प्रतिआव्हानाचे राजकारण आज सुरु आहे. आम्हाला आव्हान आणि प्रतिआव्हान देण्याआधी तुमचे हात स्वच्छ आहेत का? तुमचे हात मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत, असा खळबळजनक आरोप भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केला. मुंबईकरांच्या प्रश्नांना घेऊन तीस दिवसांत तीन प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत, असेही शेलार यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशिष शेलार म्हणाले की, “मी उद्धवजींना नम्रपणे विनंती करीन. आदित्यजींच्या नादी लागून या प्रकरणात पडू नका. आमच्यावर दगड मारायचा विचार कराल तर शंभर बोटं तुमच्याकडे येणार आहेत. आम्हाला प्रतिआव्हान देण्याआधी तुमचे हात स्वच्छ आहेत का? तुमचे हात मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत, हा आरोप मी जाणीवपूर्वक करत आहे. कमला मिल कम्पाऊंडमध्ये अनधिकृत बांधलेल्या हुक्का पार्लर आणि बारमध्ये २०१७ रोजी आग लागून १४ मुंबईकरांचा मृत्यू झाला. देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला होता. पण उद्धव ठाकरेंनी नोव्हेंबर २०२० मध्ये आपल्या मित्राच्या सांगण्यावरुन हा गुन्हा मागे घ्यायला लावला आणि मालकाला मोकळं केलं.

तसेच जगविख्यात डॉक्टर अमरापूरक हे मनपाच्या भोंगळ कारभाराचे बळी पडले. पावसाच्या पाण्यात चालत जात असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. याच वरळीच्या बीडीडी चाळीमधील चार महिन्याच्या चिमुरड्याला नायर रुग्णालयात वेळेत उपचार मिळाले नाही. बाळ रडून रडून मृत्यूमुखी पडलं. आदित्य ठाकरे बघायला सुद्ध गेले नाहीत. त्यामुळे आम्हाला आव्हान द्यायची भाषा करु नका. मुंबईकरांच्या भावना समजून घेणारे सरकार सत्तेवर बसले आहे. आज कोळीवाड्यातले प्रश्न सुटले आहेत. मुंबईकरांचे आशीर्वाद मिळाले तर पुढच्या पाच वर्षात मुंबईचे सर्व प्रश्न सोडविल्याशिवाय राहणार नाही असा शब्द सरकारतर्फे देतो, अशा शब्दात भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी वरळीतील सभेत आपल्या भावना बोलून दाखविल्या.

मुंबईतील समुद्रातून जाणाऱ्या कोस्टल रोडच्या खांबामुळे वरळी कोळीवाड्याच्या मच्छिमारांना अडचण निर्माण झाली होती. मच्छिमारांच्या बोटीच्या आड पुलाचे खांब येत होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मच्छिमार मनपा आणि राज्य सरकारकडे खांब हलविण्याची मागणी करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य केल्यामुळे आज वरळी कोळीवाड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.

तुम्ही तुमचे कुटुंब एकत्र ठेवण्यात अपयशी

जे स्वतःच्या आयुष्यात अपयशी आहेत, त्यांनी इतरांना आव्हान देऊ नये. उद्धवजी तुम्ही कौटंबिक जीवनात अपयशी झालात. तुमचे कुटुंब एकत्र ठेवू शकला नाहीत. तुमचा सख्खा भाऊ, चुलत भाऊ एकत्र ठेवू शकला नाहीत. तुम्ही तुमच्या पित्याची प्रॉपर्टी संरक्षित करु शकला नाहीत, त्यासाठी कोर्टापर्यंत तुम्हाला जावे लागेल. तुम्ही स्वपक्ष एकत्र ठेवू शकला नाहीत. राणे साहेबांपासून गणेश नाईकांपर्यत काय वाद झाले, ते आज सांगणार नाही. पण मोठमोठे नेते शिवसेना सोडून गेले. तुम्ही विचार टिकवू शकला नाहीत, तुम्ही सरकार देखील टिकवू शकला नाहीत. अशा अपयशी माणसाने यशस्वी मुख्यमंत्र्यांना आव्हान व प्रतिआव्हानाची भाषा करु नये, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader ashish shelar criticized aditya thackeray and uddhav thackeray in worli rally kvg
First published on: 07-02-2023 at 22:21 IST