शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यामधील वादामुळे मुंबई महापालिकेला ८२ लाख ५० हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना कराच्या रूपात मुंबई महापालिकेच्या तिजोरीत जमा केलेली ही रक्कम कंगना राणावतविरोधात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईसाठी खर्च झाले आहेत. माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती समोर आली आहे. यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पेंग्विन आणि कंगनाच्या खटल्यासाठी मुंबईकर कर भरतात. आता काय शिल्लक आहे. आता यांच्या मुलांची लग्नही आपल्याच पैशातून होतील असं वाटत आहे,” असं म्हणत नितेश राणे यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून या प्रकरणावर भाष्य करत टीका केली.

काय आहे प्रकरण?

अभिनेता सुशांत राजपूत प्रकरणावरून वादग्रस्त विधान केल्यानंतर कंगना राणौत विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला होता. मुंबई महापालिकेच्या ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयाने पाली हिल येथील कंगना राणौतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. या प्रकरणी कंगनाने न्यायालयात धाव घेत दाद मागितली आहे.

या प्रकरणी पालिकेच्या बाजूने ज्येष्ठ वकील, वरिष्ठ अधिवक्ता अस्पी चिनॉय न्यायालयात बाजू मांडत आहेत. या न्यायालयीन लढाईसाठी पालिकेला आतापर्यंत ८२ लाख ५० हजार रुपये खर्च आला आहे. आतापर्यंत या प्रकरणी अस्पी चिनॉय यांनी ११ वेळा न्यायालयात पालिकेची बाजू मांडली. प्रत्येक तारखेसाठी सात लाख ५० हजार रुपये याप्रमाणे पालिकेला ८२ लाख ५० रुपये खर्च आला आहे. शरद यादव यांनी पालिकेच्या विधि खात्याकडे ‘माहितीचा अधिकार कायद्या’अंतर्गत अर्ज करून कंगना राणौत विरुद्ध महापालिका प्रकरणात अस्पी चिनॉय यांना देण्यात आलेल्या शुल्काबाबतची माहिती मागितली होती. विधि खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ही बाब उघड झाली आहे.

करोनाकाळात पालिकेची आर्थिक स्थिती डळमळीत होत आहे. अशा वेळी इतकी मोठी रक्कम केवळ एका न्यायालयीन प्रकरणावर खर्च करणे कितपत योग्य आहे, असा सवाल शरद यादव यांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader nitesh rane criticize shiv sena bmc kangana ranaut court case spent more than 82 lakhs rupees jud
First published on: 28-10-2020 at 11:15 IST