मुंबई : राज्यात अराजक, बेदिली असून ठाकरे सरकार हे गुन्हेगार, दहशतवादी आणि अराजकता माजवणाऱ्यांचे समर्थक आहे. सरकारकडून हिंदू धर्म आणि महाराष्ट्र धर्मावर घाला घालण्यात येत आहे. त्या विरोधात भाजप संघर्ष करेलच, जनतेनेही हा घाला परतवून लावायला हवा, अशी टीका आमदार आशीष शेलार यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण विषयावर ठराव मांडताना केली.

राज्यात नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला आहे. सध्या आणीबाणीसदृश परिस्थिती असून समाजमाध्यमांवर कोणी टीका केली, तर गुन्हे दाखल केले जातात. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणासह अनेक घटनांमध्ये ते दिसून आल्याचे शेलार यांनी सांगितले.  कायदा, फौजदारी दंड संहिता, भारतीय दंड संहिता आणि संविधान हे सर्व मोडीत काढण्याचे काम ठाकरे सरकारकडून करण्यात येत आहे. राज्यात तक्रारदार, तपास अधिकारी, साक्षीदार सुरक्षित नाही, तर पोलिसांना वसुलीची कामे दिली जात आहेत. वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस बदलीतील भ्रष्टाचार उघड केला, तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत. सीबीआयच्या प्रमुखांना जुन्या कुठल्या तरी घटनेसाठी बोलाविण्यात येत आहे. तर दुसरीकडे पालघरमध्ये साधूंची हत्या होते. गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवावर बंदी आणली जाते. वारकऱ्यांना पंढरपूरला जाऊ दिले जात नाही. राम मंदिराच्या तारखेची आणि वर्गणीची खिल्ली  उडवली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदू सुरक्षित नाही तसाच महाराष्ट्र धर्मही सुरक्षित नाही, असे शेलार यांनी मांडलेल्या ठरावात नमूद करण्यात आले आहे. गुन्हेगारीचे समर्थन कसे केले जात आहे हे सांगताना शेलार यांनी काँग्रेसच्या अमरावतीच्या मंत्र्यांनी एका पोलीस शिपायाला मारले त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला, पण त्यांच्या राजीनाम्याबाबत कोणी काहीही बोलत नाही, असे नमूद केले.