मुंबईः सातत्याने पाठपुरावा करुनही सिडकोचे अधिकारी दाद देत नाहीत, लोकांना पाणी मिळत नाही, आमदारांनी वारंवार तक्रारी करूनही त्यांच्यावर काही परिणाम होत नाही, त्यामुळे आम्ही राजीनामे द्यावे का संतप्त सवाल करीत भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला.
सिडकोच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचन मांडली होती. त्यावर सिडकोच्या जलवितरण व्यवस्थेत ऑटोमायझेशन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून यासाठी पुढील दोन महिन्यांत ऑटोमायझेशनसाठीचे टेंडर काढण्याचे स्पष्ट आदेश सिडकोला देण्यात येथील अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. पनवेल आणि परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना करण्यात येणार आहेत. सिडकोच्या माध्यमातून पाणीवाटपात पारदर्शकता आणण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठी अत्याधुनिक प्रणालींचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सिडकोचे अधिकारी एकत नाहीत. लोकांना पाणी मिळत नाही, आमदारांनी वारंवार तक्रारी करूनही त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. या भागातील रहिवासी संतप्त आहेत , आम्ही आमदार म्हणून आमच्याकडे ते तक्रारी करतात, आम्ही याप्रकरणी अधिकाऱ्यांना भेटून सांगूनही ते दुर्लक्ष करतात आता आम्ही राजीनामे देतो असे ठाकूर म्हणाले . त्यावर पुढील दोन महिन्यात स्वयंचलित यंत्रणा उभी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध न केल्यास सिडकोच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही देखील सामंत यांनी दिली.