दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासारखे हिमदूंचे सण दरवर्षीप्रमाणेच रस्त्यांवरच किंवा नेहमीच्याच ठिकाणी साजरे करता यावे आणि न्यायालयीन आदेशामुळे त्यात अडथळे येऊ नयेत, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज सादर करण्याचा निर्णय मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी घेतला आहे. फूटपाथ वापरण्याचा नागरिकांचा हक्कअसला तरी कायदेशीर मार्गाने उत्सव साजरे करण्याचा मंडळांनाही मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे कायदेशीर अडचणी न येता उत्सव कशा पद्धतीने साजरा करता येईल, यासाठी पक्षात विचारमंथन सुरू आहे. या संदर्भात न्यायालयात बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संबंधितांची बैठकही लवकरच आयोजित केली जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे करण्यास न्यायालयाने घातलेल्या र्निबधांमुळे मंडळांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शेलार यांनी मंडळांचे प्रतिनिधी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक दादर येथील कार्यालयात आयोजित केली होती. न्यायालयाने महापालिका आयुक्तांच्या अधिकारावर र्निबध घातले असून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके करून उत्सवांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अन्य धर्मीयांच्या उत्सवांवरही र्निबध येऊ शकतात आणि यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी शेलार यांनी मुख्यमंत्र्याकडे केली असून ते अमेरिकेहून परतल्यावर ती होईल.