महाराष्ट्रात १३०० सरकारी शाळा बंद करणारे महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे दिल्लीत भाजपाचा प्रचार करत आहेत असे विधान करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विधानाचा भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी चांगलाच समाचार घेतला. अरविंद केजरीवाल यांचे विधान म्हणजे और एक झूठ असल्याचा टोला तावडे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात १३०० सरकारी शाळा कधी बंद झाल्याच नव्हत्या अशी वस्तुस्थिती मांडतांना विनोद तावडे यांनी सांगितलं की, “राज्यात सुमारे ९० शाळा बंद झाल्या, त्या पण सरकारी शाळांमध्ये फक्त दोन ते तीन मुलं शिकत होती, त्या शाळांमधील मुलांना जवळच्या सरकारी शाळांमध्ये विलिन करुन प्रवेश देण्यात आला व त्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यात आले. परंतु केजरीवाल मात्र खोटा प्रचार करीत आहेत व दिल्लीकरांची विनाकारण दिशाभूल करीत आहेत”.

“मी दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात उतरल्यामुळे केजरीवाल यांनी धसका घेतल्याचं दिसतंय असाही टोला त्यांनी लगावला. भाजपाच्या खासदारांनीच दिल्लीच्या शिक्षणाविषयी केलेल्या पोलखोलमुळे केजरीवाल धास्तावले आहेत. महाराष्ट्रामध्ये शाळाचा निकाल हा नववी, दहावीमधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर ठरवण्यात येतो. नववीमध्ये मुलांना मुद्दाम नापास करुन दहावीचा निकाल आम्ही ठरवत नाही,” असाही टोला तावडे यांनी केजरीवाल यांनी लगावला.

“तसंच असरच्या अहवालात महाराष्ट्रातील शासकीय शाळांमधील दर्जा हा खासगी शाळांपेक्षा अधिक चांगला असल्याचे नमूद करण्यात आले आहे याची माहितीही केजरीवाल यांनी घ्यावी,” असा सल्ला यावेळी विनोद तावडे यांनी दिला.

आणखी वाचा – महाराष्ट्रातील १३०० शाळा बंद करणाऱ्या तावडेंना दिल्लीतील शाळा दाखवा – केजरीवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केजरीवाल यांनी काय म्हटलं आहे –
दिल्लीत भाजपा उमेदवाराचा प्रचार करतानाच विनोद तावडे यांचे दोन फोटो केजरीवाल यांनी ट्विट केले आहेत. त्याचबरोबर “विनोद तावडे हे महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आहेत. ज्यांनी राज्यातील १३०० सरकारी शाळा बंद केल्या. ते आता दिल्लीत भाजपाचा प्रचार करण्यासाठी आले आहेत. दिल्लीकरांनों, ‘आप’ने खूप मेहनत घेऊन सरकारी शाळा चांगल्या केल्या आहेत. त्यांना आपल्या शाळा दाखवा, छोले भटूरे खाऊ घाला आणि दिल्ली दाखवा. ते आपले अतिथी आहेत,” अशी टीका केली आहे.